प्रबळ इच्छाशक्तीने प्रगती शक्य
By Admin | Updated: January 13, 2015 01:04 IST2015-01-13T01:04:01+5:302015-01-13T01:04:01+5:30
अंधत्वावर मात करून मयंक मनोज साहू याने भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतात नाव कमाविले आहे. त्याने संगीत क्षेत्रात प्राप्त केलेले यश हे विदर्भाचे नाव राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय

प्रबळ इच्छाशक्तीने प्रगती शक्य
मयंकला नागभूषण पुरस्कार : नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनचे आयोजन
नागपूर : अंधत्वावर मात करून मयंक मनोज साहू याने भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतात नाव कमाविले आहे. त्याने संगीत क्षेत्रात प्राप्त केलेले यश हे विदर्भाचे नाव राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविणारे आहे. प्रबळ इच्छाशक्तीने प्रगती शक्य असून, २१ व्या शतकात त्याचे नाव सुवर्णाक्षरात कोरले जाईल, असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केला. नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनच्या वतीने २०१४ चा युवा नागभूषण पुरस्कार १७ वर्षीय अंध मयंक मनोज साहू याला शंकरनगर चौक येथील राष्ट्रभाषा संकुलातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात सोमवारी आयोजित विशेष समारंभात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अनिल देशमुख तर प्रमुख अतिथी आ. मिलिंद माने होते. मंचावर आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर मुंडले, सचिव गिरीश गांधी, सदस्य डी.आर. मल आणि मनोज साहू हजर होते. पुरस्कारात ५० हजार रुपये रोख व मानचिन्ह देण्यात आले.
आ. मिलिंद माने म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत मयंकने मिळविलेली कीर्ती अलौकिक आहे. संगीत माणसाला जगणे शिकविते. भावी आयुष्याच्या शुभेच्छा देताना मयंकला आॅस्कर पुरस्कार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
अनिल देशमुख म्हणाले की, मयंक हा डोळस व्यक्तिमत्त्वाचा प्रतिभावंत कलावंत आहे. छोट्या वयातच त्याने उत्तुंग भरारी घेतली आहे. तो नागपूरचा अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवावे.
गिरीश गांधी यांनी फाऊंडेशन आणि पुरस्काराची रूपरेषा सांगितली. युवा नागभूषण पुरस्कार २००९ पासून तर नागभूषण पुरस्कार २००२ पासून देण्यात येतो. खरी प्रतिभा युवकांमध्ये असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक प्रभाकर मुंडले यांनी तर संचालन अजय गंपावार यांनी केले.
कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता, नगरसेविका प्रगती पाटील, प्रेम लुणावत, रमेश बोरकुटे, राजू पोद्दार, श्रीराम काळे, अनिल राठी, प्रदीप माहेश्वरी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नवे शिकण्याचा प्रयत्न : मयंक साहू
संगीत क्षेत्रात नवे शिकण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो, असे मत मयंक साहू याने व्यक्त केले. जीवनात भरारी देणारा मोठा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. ‘हम इंडिया वाले ...’ हे गीत गाऊन त्याने सुरातूनच फाऊंडेशनचे आभार मानले. मयंकची लिम्का आणि गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. १७ वर्षीय मयंक मनोज साहू हा अंध असून, त्याने भारतीय व पाश्चिमात्य संगीतासोबतच पियानो, सिन्थेसायझर, तबला यासारख्या वाद्यांचेही प्रशिक्षण घेतले आहे. त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १५० पेक्षा जास्त शो केले. मयंक जगातील नववे आश्चर्य असल्याचे मत पं. जसराज यांनी व्यक्त केले आहे.