मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता
By Admin | Updated: October 11, 2014 05:39 IST2014-10-11T05:39:23+5:302014-10-11T05:39:23+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या पक्षांनी स्वतंत्र चुली मांडल्याने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची संख्या वाढली आहे

मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या पक्षांनी स्वतंत्र चुली मांडल्याने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची संख्या वाढली आहे. एकूण ४ हजार ११७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारांमध्येही, विशेषत: नवमतदारांमध्ये उत्साह दिसत असल्याने, मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
उमेदवारांच्या संख्येने चार हजाराचा टप्पा ओलांडण्याची ही दुसरी वेळ आहे. १९९५मध्ये ४७१४ उमेदवार रिंगणात होते. यावेळी सुमारे चार हजार उमेदवारांपैकी काँग्रेससह चार प्रमुख पक्षांचेच मिळून ११४६ उमेदवार आहेत. काँग्रेस सर्व २८८ जागा लढवित असून राष्ट्रवादी २८६, भाजपा २५७ आणि शिवसेना २८५ जागांवर लढत आहे. मात्र यात महिलांची संख्या अवघी ७४ आहे.
१९६२ पासूनच्या गेल्या ११ निवडणुकांमध्ये १९८०मध्ये सर्वात कमी ५३.३० टक्के तर, सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदान १९९५मध्ये नोंदवले गेले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढेल, असे मत काही विश्लेषकांचे आहे.