मॉल, शोरूमवर अटींची शक्यता
By Admin | Updated: April 7, 2015 04:41 IST2015-04-07T04:41:15+5:302015-04-07T04:41:15+5:30
गोव्यातील फॅब इंडिया शोरूममध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती शहरात कोठेही, कोणासोबतही घडू नये यासाठी

मॉल, शोरूमवर अटींची शक्यता
मुंबई : गोव्यातील फॅब इंडिया शोरूममध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती शहरात कोठेही, कोणासोबतही घडू नये यासाठी मुंबई पोलीस अॅक्शन प्लॅन आखत आहेत. त्यानुसार मॉल, तयार कपड्यांची छोटी-मोठी शोरूम्स, ट्रायल रूम, चेंजिंग रूम असतील अशा आस्थापना चालकांना काही अटी घातल्या जाऊ शकतात. तसेच अशा घटनांची जबाबदारी थेट चालक, मालकांवर येऊ शकते.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी गोव्याच्या कँडोलीम परिसरातील फॅब इंडिया शोरूममध्ये इराणी कपडे खरेदीसाठी गेल्या होत्या. पसंत पडलेले कपडे घालून पाहण्यासाठी त्या शोरूमच्या ट्रायल रूममध्ये गेल्या. कपडे बदलता बदलता त्यांचे लक्ष ट्रायल रूमबाहेर उंचावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीकडे गेले. हा सीसीटीव्ही ट्रायल रूममधील चित्रण टिपत होता. इराणी यांच्या तक्रारीनंतर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हे शाखेने शोरूममधील चार कर्मचाऱ्यांना या प्रकरणी अटक केली. तसेच शोरूमच्या मालकापासून अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली.
अशा प्रकारे चोरून महिलांचे व्हीडीओ रेकॉर्ड करणे, क्लीप काढणे हे मुंबई, ठाणेसारख्या शहरांना नवे नाही. याआधी अशा प्रकारे चोरून चित्रण केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र इराणींबाबत असा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेतल्याचे समजते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, असे प्रकार रोखण्यासाठी काय करता येईल याबाबत एक अॅक्शन प्लान लवकरच निश्चित केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल.
महिला स्वच्छतागृहांपासून ट्रायल रूमपर्यंत अनेक ठिकाणी असे प्रकार घडू शकतात हे लक्षात घेऊन त्या-त्या आस्थापनांच्या मालक, चालकांना नियम व अटी घातल्या जातील. चोरून बसविण्यात आलेले इलेक्ट्रॉॅनिक गॅॅझेट्स जसे सीसीटीव्ही, छुपा कॅमेरा, मोबाइल शोधून काढणारी यंत्रणा (डीप बकिंग इन्स्ट्रूमेंट) बाजारात उपलब्ध आहे. ती बसवून घेतल्यास असे प्रकार टाळता येतील. (प्रतिनिधी)