ऊर्जामंत्र्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील छायाचित्र
By Admin | Updated: July 15, 2017 23:11 IST2017-07-15T23:11:35+5:302017-07-15T23:11:35+5:30
मुख्य अभियंता तडकाफडकी निलंबित

ऊर्जामंत्र्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील छायाचित्र
लोकमत न्यूज नेटवर्क--शिरगाव (चिपळूण) : व्हॉटसअॅप ग्रुपवर अश्लील छायाचित्र टाकल्याप्रकरणी महानिर्मिती कंपनीच्या कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील मुख्य अभियंता व्ही. एम. खोकले यांना शनिवारी तडकाफडकी निलंबीत करण्यात आले. या ग्रुपमध्ये ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचाही समावेश आहे.
महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी शनिवारी याबाबतचे आदेश जारी केले. १४ जुलैला रात्री १२ ते १ यादरम्यान खोकले यांनी व्हॉटसअॅप ग्रुपवर एक अश्लील छायाचित्र पोस्ट केले. हे वर्तन महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक कंपनी २०१५ सेवा विनिमय क्रमांक ८६ अनुसूचित ८८ (क) यानुसार गैरकृ त्यात मोडते. त्यामुळे हा आदेश काढण्यात आला.
खोकले यांनी दर सोमवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात समक्ष हजेरी लावावयाची आहे. त्यांनी मुख्यालय सोडावयाचे नाही, अशी अट त्यांना घालण्यात आली आहे.
आज १५ जुलैपासूनच यावर कार्यवाही करण्यात आली असून दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे त्यांचा पदभारही देण्यात आल्याचे समजते.
मंत्री असलेल्या ग्रुपवरच
मुख्य अभियंता खोकले यांनी ‘एनर्जी मिनिस्टर लाईव्ह’ या व्हॉटसअॅप ग्रुपवर हा अश्लील फोटो पोस्ट केला आहे. महानिर्मितीच्या दैनंदिन महत्त्वाच्या कामाबाबत हा ग्रुप सुरू करण्यात आला आहे. या ग्रुपवर इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचाही समावेश आहे.