सोळा विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे
By Admin | Updated: July 30, 2016 04:25 IST2016-07-30T04:25:22+5:302016-07-30T04:25:22+5:30
शाळेतील मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला आहे. कलिना येथील शाळेत हा प्रकार घडला असून, पालकांनी दोन शिक्षकांना चांगलाच चोप देत वाकोला

सोळा विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे
मुंबई : शाळेतील मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला आहे. कलिना येथील शाळेत हा प्रकार घडला असून, पालकांनी दोन शिक्षकांना चांगलाच चोप देत वाकोला पोलिसांच्या स्वाधीन केले.
कलिना परिसरातील शास्त्रीनगरमध्ये एका शाळेत विद्यार्थिनीसोबत गैरप्रकार सुरू असल्याचे शिक्षण समितीच्या माजी अध्यक्ष आणि सध्या सदस्य असलेल्या वॉर्ड क्रमांक १२१च्या नगरसेविका रितू तावडे यांना गुरुवारी रात्री समजले.
या शाळेत शिकविणाऱ्या तसेच कर्करोगाने ग्रस्त असलेल्या शाहीन खान या शिक्षिकेची बीकेसीच्या शाळेत बदली केली जात होती. त्याची चर्चा करताना तावडे यांनी सहज या शाळेतील विविध इयत्तेतील मुलींची चौकशी केली. तेव्हा दोन शिक्षक त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचे त्यांनी तावडे यांना सांगितले.
त्यानुसार शुक्रवारी तावडेंनी शिक्षण विभागाच्या काही सदस्यांसोबत तडक या शाळेत जात या दोन्ही शिक्षकांना जाब विचारला. त्या वेळी चिडलेल्या पालकांनी या दोघांना चांगलाच चोप देत त्यांच्या तोंडाला काळे फासले. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्या दोघांना त्यांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)
हमारे साथ कुछ ठीक नही हो रहा !
‘मी इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थिनींशी सहज चर्चा केली. तेव्हा ‘हमारे साथ कुछ ठीक नही हो रहा, दो सर हमारे साथ गलत करते है,’ असे त्यांनी सांगितल्याचे तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्या सोळा मुलींशी मी बोलले त्यांनी याच दोघांची नावे घेतली, असेही त्यांनी नमूद केले. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही त्या दोघांच्या निलंबनाची तसेच पुन्हा त्यांना अन्य कोणत्याही शाळेत सेवेत न ठेवण्याची कारवाई करण्याची मागणी केल्याचेही त्या म्हणाल्या.
अद्याप तक्रारदारांचा पुढाकार नाही
‘ज्या दोन शिक्षकांवर आरोप करण्यात आला आहे, त्यांना आम्ही ताब्यात घेतले आहे. दोघांची चौकशी करीत आहोत. ज्यात त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे; तसेच अद्याप या दोघांविरोधात आमच्याकडे एकही तक्रारदार आलेला नाही. पालकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आम्ही केल्याचे वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव व्हावळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.