अश्लील ‘पुण्य’कर्म!
By Admin | Updated: January 25, 2015 02:31 IST2015-01-25T02:31:57+5:302015-01-25T02:31:57+5:30
सांस्कृतिक राजधानीतून मिळालेला प्रतिसाद ही तशी एरव्ही मिरवण्याचीच बाब; पण याच थोरवीच्या ‘पुण्य’कर्माला गालबोट लागण्याची घटना शुक्रवारी पुण्यात ‘मिस्टर अॅण्ड मिसेस’ या नाटकाबाबत घडली.

अश्लील ‘पुण्य’कर्म!
सांस्कृतिक प्रमाद : भर नाटकात पे्रक्षकांनी केली असभ्य शेरेबाजी, सभ्यतेची ऐशीतैशी
पुणे : अभिरुचीसंपन्न अशा राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतून मिळालेला प्रतिसाद ही तशी एरव्ही मिरवण्याचीच बाब; पण याच थोरवीच्या ‘पुण्य’कर्माला गालबोट लागण्याची घटना शुक्रवारी पुण्यात ‘मिस्टर अॅण्ड मिसेस’ या नाटकाबाबत घडली. आशयघन संहिता आणि चिन्मय मांडलेकर व मुधरा वेलणकर अभिनित अत्यंत कौटुंबिक अशा या नाटकादरम्यान प्रेक्षकांनी केलेल्या अश्लील आणि असभ्य शेरेबाजीमुळे नाटक काहीवेळ थांबवावं लागलं! विशेष म्हणजे प्रेक्षक म्हणून आलेल्या वकीलवर्गाकडून हा सांस्कृतिक प्रमाद घडल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य ‘बा-कायदा’ वाढले आहे.
टिळक स्मारक मंदिर येथे पुणे बार असोशिएशनतर्फे ‘मिस्टर अॅण्ड मिसेस’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांमध्ये वकील आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. १५२व्या प्रयोगाला सुरुवात होताच प्रेक्षकांमधून अश्लील शेरेबाजी सुरू झाली. नाटकाशी संबंधित मंडळींनी प्रेक्षकांना शेरेबाजी थांबविण्याचे आवाहन केले, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. या अनपेक्षित ‘प्रतिसादाने’ नाटकात प्रमुख भूमिका करणारे चिन्मय मांडलेकर आणि अभिनेत्री मुधरा वेलणकर या कलावंताना धक्काच बसला. त्यांनी काहीवेळ नाटक थांबविले, पण नंतर ‘शो मस्ट गो आॅन’ म्हणत प्रयोग सुरू ठेवला.
पुण्यात घडलेल्या या ‘असांस्कृतिक’ घटनेची वार्ता कानी पडताच सांस्कृतिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी या अभिरुचीहीन कृतीचा निषेध नोंदविला. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, की ‘मिस्टर अॅण्ड मिसेस’ हे नाटक मी पाहिले आहे. ते खूप सुंदर नाटक आहे. चिन्मय व मधुरा यांच्याविषयी मला आदर आहे. ते कधीही खोटे बोलणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल असा प्रकार होणे दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे.
मात्र पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विकास ढगे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले, की नाटक सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांनी कलाकारांच्या स्वागतासाठी
उत्स्फूर्त शिट्या वाजविल्या.
त्यामुळे केवळ एका मिनिटासाठी कलाकारांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही. याव्यतिरिक्त काहीही घडलेले नाही.
नाटक सुरू होण्यापासून ते प्रयोगानंतर कलाकार त्यांच्या गाडीत बसेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो. मात्र त्यांच्यापैकी कोणीही याबाबत ‘ब्र’ काढला नाही.
नंतर फेसबुकच्या माध्यमातून जाहीरपणे आरोप करणे, हा तर प्रसिद्धीचा स्टंट आहे. कलाकारांनी केलेल्या आरोपांमुळे जर बार असोसिएशनची बदनामी होत असल्याचे तपासाअंती आढळून आले, तर त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा ठोकण्यात येईल.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले की प्रेक्षकांनी कलाकारांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्त शिट्या वाजविल्या. त्यामुळे केवळ एका मिनिटासाठी कलाकारांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही. या काहीही घडलेले नाही.
नाटक हा सभ्य माणसांचा उद्योग आहे. व्यावसायिक रंगभूमीवर कलाकार नाटक सादर करीत असताना त्यांच्या कलेचा मान राखणे, हे प्रेक्षकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे नाटकाचा प्रयोग सुरू असताना शेरेबाजी होणे, हे खूप दुर्दैवी आहे.
-सतीश आळेकर,
ज्येष्ठ नाट्यकर्मी
शेम ! शेम ! शेम !
नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर अभिनेता चिन्मयने फेसबुकच्या माध्यमातून या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, की नाटकभर प्रेक्षकांमधून अश्लील शेरेबाजी होत राहिली. शेवटी एका पॉइंटला नाटक थांबवावं लागलं. या गोष्टीतून पुन्हा एकदा जाणवलं, की आपल्या देशात ‘शिक्षण’ आणि ‘सुसंस्कृतपणा’ यांचा काहीही संबंध नाही. शेम!
यापूर्वीही असेच काही
च्नाटक सुरू असताना मोबाइल वाजण्याचे प्रकार घडतात़ त्याचा त्रास पात्रांना होतो़ ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी असे मोबाइल वाजल्यानंतर काही वेळा प्रयोग थांबवून प्रेक्षकांना समज दिली होती़
च्अशोक हांडे यांच्या ‘मंगलगाणी दंगलगाणी’च्या प्रयोगालाही ‘मग आता लावणी होऊन द्या,’ अशी मागणी करून शिट्या वाजविल्या गेल्या आहेत़