राज्यात पाऊस सरासरी गाठेना!

By Admin | Updated: July 9, 2016 20:04 IST2016-07-09T20:04:53+5:302016-07-09T20:04:53+5:30

बहुतांशी जून महिना कोरडा गेल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असला तरी तो अजून सरासरी गाठू शकलेला नाही

Populate the average rainfall in the state! | राज्यात पाऊस सरासरी गाठेना!

राज्यात पाऊस सरासरी गाठेना!

>ऑनलाइन लोकमत -
आत्तापर्यंत ९० टक्केच पाऊस : नाशिक जिल्हयात अवघा ४४ टक्केच पाऊस
पुणे, दि. 09 - बहुतांशी जून महिना कोरडा गेल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असला तरी तो अजून सरासरी गाठू शकलेला नाही. १ जूनपासून आत्तापर्यंत राज्यात जेवढा पाऊस पडणे अपेक्षित होते, त्यापेक्षा १० टक्के पाऊस कमी पडला आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात आत्तापर्यंत सर्वात कमी पाऊस नाशिक जिल्हयात झाला असून तो सरासरीच्या केवळ ४४ टक्केच पडला आहे.
 
गेल्या २ वर्षांपासून सलग पडलेल्या दुष्काळाने महाराष्ट्र होरपळून निघाला होता. पावसाअभावी अनेक ठिकाणी शेती ओसाड पडल्या होत्या. तर धरणांमधील पाणीसाठाही संपण्याच्या मार्गावर पोहोचल्याने पिण्याच्या पाण्याचीही गंभीर टंचाई निर्माण झाली होती. अशातच महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडणार असे भाकित भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले होते. त्यामुळे शेतक-यांसह सामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते होते. मात्र जून महिन्यात मान्सून राज्यात उशीरा दाखल झाला आणि त्यानंतरही खूप कमी प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून पावसाने मुसळधारपणे बरसण्यास सुरूवात केली आणि जुलै महिन्यातही तो मुक्तपणे बरसतच आहे. असे असले तरी राज्यातील पाऊस अजूनही सरासरी गाठू शकलेला नाही. राज्याच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात १ जूनपासून आत्तापर्यंत ३२७.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात या काळात २९४.३ मिमीच पाऊस पडला आहे. तो सरासरीच्या ९० टक्के आहे.
 
राज्यात प्रत्येक भागात पावसाचे प्रमाण वेगवेगळे राहिले आहे. काही जिल्हयांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे तर काही जिल्हयांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी पडला आहे. राज्यात सर्वात कमी अवघा ४४ टक्केच पाऊस नाशिक जिल्हयांमध्ये पडला आहे. त्यापाठोपाठ नंदूरबार जिल्हयात ५४ टक्केच पाऊस पडला आहे. कोल्हापूर जिल्हयात अवघा ६० टक्केच, धुळे जिल्हयात ७१ टक्के, जळगाव जिल्हयात ७२ टक्के, सोलापूर, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्हयात ७५ टक्के, यवतमाळ जिल्हयात ७७ टक्के, भंडारा जिल्हयात ७८ टक्केच पाऊस पडला आहे. 
 
राज्यात आत्तापर्यंत सर्वाधिक पाऊस सांगली जिल्हयात पडला आहे. तेथे आत्तापर्यंत १३८ टक्के पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ रत्नागिरी जिल्हयात १२० टक्के, पालघर जिल्हयात ११७ टक्के पाऊस पडला आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतातूर झालेल्या शेतकºयांमध्ये मुसळधार पावसामुळे आनंदाचे वातावरण आहे. पाऊस पडू लागल्याने शेतकºयांकडून शेतात पेरण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत.
 
राज्यातील पाऊस दृष्टिक्षेपात
५० टक्क्यांहून कमी पाऊस : नाशिक.
५० ते ७५ टक्के दरम्यान पाऊस : धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद
७५ ते १०० टक्के पाऊस : अहमदनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर.
१०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, गडचिरोली.
 
गतवर्षी याच काळात पडला होता ७३ टक्के पाऊस
गतवर्षीपेक्षा यावर्षीची पावसाची स्थिती चांगली आहे. गेल्यावर्षी याच काळात राज्यात ७३ टक्केच पाऊस पडला होता. यावर्षी त्यापेक्षा १७ टक्के जास्त पाऊस पडला आहे. गतवर्षी सातारा, सांगली, नागपूर आणि गडचिरोली राज्यांमध्येच पाऊस सरासरी गाठू शकला होता. उर्वरित सर्व जिल्हयांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. 
 
नाशिकमध्ये सलग तिस-या वर्षीही कमी पाऊस
नाशिक जिल्हयामधील दुष्काळ अजूनही संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. गेल्या २ वर्षापासून दुष्काळाने होरपळणाºया नाशिककडे यंदाही पावसाने पाठ फिरविली आहे. गतवर्षी २०१५ मध्ये नाशिकमध्ये १ जून ते आत्तापर्यंतच्या ४९ टक्के पाऊस पडला होता. यंदा तर यापेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यावर्षी या काळात अवघा ४४ टक्के पाऊस पडला आहे. 
 

Web Title: Populate the average rainfall in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.