निवडणुकीच्या वादातून दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: March 2, 2017 01:54 IST2017-03-02T01:54:00+5:302017-03-02T01:54:00+5:30
ओळकाईवाडी, कुसगाव येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांत मंगळवारी रात्री ११:३० वाजता हाणामारी झाली.

निवडणुकीच्या वादातून दोन गटांत हाणामारी
लोणावळा : ओळकाईवाडी, कुसगाव येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांत मंगळवारी रात्री ११:३० वाजता हाणामारी झाली. यामध्ये शिवसेनेच्या ठोंबरे गटाने केलेल्या मारहाणीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांचे पुतणे व तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक नितीन रतन साळवे (वय ३४) व कुसगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रवीण रतन साळवे (वय ३१, रा. कुसगाव, लोणावळा) हे जखमी झाले. साळवे गटाच्या मारहाणीत शिवसेनेचे अतिष राजू केदारी (वय २३, रा. कुसगाववाडी, लोणावळा) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांकडून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
नितीन रतन साळवे यांच्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवसेनेचे कुसगाव ग्रामपंचायत सदस्य गबळू ठोंबरे, रवी घोंगे, किसन ठोंबरे, बाळू काळे, अमोल ठोंबरे, बाळा ठोंबरे, अजित केदारी, मनोज केदारी, विजय घोंगे व इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला .
पंचायत समितीच्या निवडणुकीत कुसगाव गावातून शिवसेनेच्या वतीने उषा संजय घोंगे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजश्री संतोष राऊत उमेदवार होत्या. निवडणुकीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे हे प्रचारप्रमुख होते. निवडणुकीत राऊत विजयी झाल्या व शिवसेनेच्या उमेदवार पराभूत झाल्या. हा राग मनात धरून मंगळवारी रात्री शिवसेनेचे रवी घोंगे व गबळू ठोंबरे हे रमेश साळवे यांच्या सोबत ओळकाईवाडी चौकात वाद घालत होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही माहिती मिळताच साळवे यांचे पुतणे नितीन व प्रवीण हे चौकात आले असता ठोंबरे यांनी तलवारीने नितीन यांच्या डोक्यात वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. इतर आरोपींनी काठ्या, चाकूने प्रवीणला मारहाण केली. या वेळी रमेश यांना गाडीत बसविले असता, आरोपींनी गाडीवर मागासवर्गीय जातीचे म्हणून शिवीगाळ करत हल्ला केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
विरोधी गटाचे अतिष राजू केदारी (वय २३, रा. कुसगावाडी) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, नितीन साळवे, प्रवीण साळवे, किरण साळवे व एक अनोळखी इसम यांच्यावर भादंवि कलम ३२६, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या वादातून साळवे यांनी हातातील दांडके व हत्यारांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
स्वाभिमानी रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष व बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक बरकत मुजावर यांची भेट घेत घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्याची व रमेश साळवे यांना संरक्षण देण्याची मागणी केली. शिवसेनेच्या वतीने देखील जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत तपास अधिकारी व अप्पर अधीक्षक यांची भेट घेण्यात आली. (वार्ताहर)
>तणाव : पोलीस अप्पर अधीक्षकांनी दिली भेट
घटनेची माहिती मिळताच कुसगावात व परिसरात निर्माण झालेले तणावाचे वातावरण पाहता पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, उपअधीक्षक बरकत मुजावर, उपविभागीय अधिकारी अजित शिंदे, ग्रामीण एलसीबीचे पोलीस निरीक्षक राम जाधव, शहरचे निरीक्षक चंद्रकांत जाधव, कामशेतचे निरीक्षक आय.एस.पाटील, लोणावळा ग्रामीणचे सहायक निरीक्षक संदीप येडे पाटील, वडगावचे उपनिरीक्षक लोणीकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी तीन जणांना एलसीबीने ताब्यात घेतले असल्याचे तपास अधिकारी मुजावर यांनी सांगितले.