जिल्ह्यात ३१ आॅगस्टपर्यंत मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 02:17 IST2016-06-08T02:17:15+5:302016-06-08T02:17:15+5:30
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण मोहीम-२०१६ ही देशभरात राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ३१ आॅगस्टपर्यंत मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम
अलिबाग : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण मोहीम-२०१६ ही देशभरात राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात देखील ती ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत मतदार यादीचे शुध्दीकरण करण्यात येणार असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शीतल तेली-उगले यांनी मंगळवारी दिली आहे.
जिल्हाधिकारी तेली-उगले म्हणाल्या, या मोहिमेमध्ये नवीन मतदारांची नावनोंदणी करणे, स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे व नवीन मतदार संघात त्यांची नोंदणी करणे तसेच मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. मतदार याद्यांचे शुध्दीकरण करताना स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यासाठी विवाह नोंदवही, मृत मतदारांची नावे वगळण्याकरिता मृत्यू नोंदवही याची तपासणी करु न कार्यवाही करण्यात येणार आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील माहिती पोलीस दलाकडून घेण्यात येणार आहे. स्थलांतरित मतदाराचे नाव वगळण्यासाठी संबंधितांना संधी देऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणारे नागरिक मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकतात. नवीन मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी महाविद्यालयाच्या ठिकाणी शिबिर भरविण्यात येणार आहेत व सर्व अर्ज त्याच ठिकाणी भरु न घेण्यात येणार आहेत. मागच्या वर्षी ५४ हजार नवीन मतदारांची नावनोंदणी झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नवीन मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले. आगामी काळात येणाऱ्या ग्रामीण आणि नागरी भागातील निवडणुकांमध्ये या मतदार यादीचा वापर करण्यात येणार आहे.पात्र मतदारांची मतदार यादीत नोंदणी करणे, मृत, स्थलांतरित मतदारांची नावे कमी करणे आदी सर्व माहितीसह अद्ययावत व बिनचूक मतदार यादी तयार करण्यात येणार आहे.
>२० लाख ४० हजार ३४६ मतदार
रायगड जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदार संघ असून एकूण मतदान केंद्रे २ हजार ४९३ आहेत. मतदार एकूण २० लाख ४० हजार ३४६ असून त्यामध्ये पुरु ष मतदार १० लाख ४२ हजार ९७९ तर स्त्री मतदार ९ लाख ९७ हजार ३६७ आहेत.
मतदार यादीत ९३.६५ टक्के मतदारांचे फोटो आहे. मतदार ओळखपत्र टक्केवारी ९४.७९ आहे. नवीन मतदान केंद्र करावयाचे झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या जागा शोधण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून ३१ आॅगस्टनंतर या मतदार याद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.