राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही
By Admin | Updated: September 21, 2015 00:31 IST2015-09-21T00:28:41+5:302015-09-21T00:31:27+5:30
‘मॉर्निंग वॉक’मधील सूर : पुरोगामी संघटनांकडून पोलिसांच्या तपासावर समाधान

राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही
कोल्हापूर : पुरोगामी संघटनांतर्फे पानसरेंचे सागरमाळ येथील निवासस्थान ते शिवाजी विद्यापीठ या मार्गावर रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘मॉर्निंग वॉक’मध्ये पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर समाधान व्यक्त करण्यात आले.
संशयिताला पकडण्यात यश मिळाले असले तरी या तपासात राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. पोलिसांना पुढील तपासासाठी सगळ्यांनीच सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. गोविंद पानसरे सकाळी सागरमाळ ते शिवाजी विद्यापीठ परीक्षा भवन या मार्गावर फिरायला जात होते़ त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर २० फेबु्रवारीला पानसरे यांचे निधन झाले होते़ या खुनानंतर पुरोगामी चळवळीला निर्भयतेचा संदेश देण्यासाठी डाव्या आणि अन्य पुरोगामी कार्यकर्त्यांनी पानसरेंच्या या मार्गावर गेले सात महिने दर महिन्याच्या २० तारखेला ‘मॉर्निंग वॉक’ सुरू केले.
यावेळी नर्मदा आंदोलनातील कार्यकर्त्या सुनीती सुलभा रघुनाथ म्हणाल्या, प्रागतिक विचारांचे लोक धर्माचा पगडा असलेल्या सर्वसामान्य लोकांशी फटकून वागतात़ या सर्वसामान्य लोेकांना धर्मांधाकडून होणारे शोषण माहीत नसते़ त्यामुळे ते सहजपणे ‘सनातन’सारख्या धर्मांध शक्तीसोबत एकरूप होतात़ अशा हिंदू नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना पुरोगामीत्व समजून सांगणे व त्यांची शोषणातून मुक्तता करणे ही पुरोगाम्यांची जबाबदारी आहे़ सकाळी सात वाजता या ‘मॉर्निंग वॉक’ला पानसरे यांच्या घरापासून प्रारंभ झाला़ ‘आम्ही सारे पानसरे’ अशा टोप्या घातलेले कार्यकर्ते या वॉकमध्ये सहभागी झाले होते़ मारेकरी सापडून त्यांना शिक्षा होईपर्यंत हे वॉक सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला़ वॉकमध्ये मेघा पानसरे, सुरेश शिपूरकर, तनुजा शिपूरकर, दिलीप पवार, व्यंकाप्पा भोसले, एस़ बी़ पाटील, उदय नारकर, प्रा़ रणधीर शिंदे, अलका देवलापूरकर, सुचेता पडळकर, विनय रघुनाथ, नरहर कुलकर्णी, जीवन बोडके, राजेंद्र पारिजात, उमेश पानसरे, कबीर पानसरे, ज्योती भालकर, सीमा पाटील, रसिया पडळकर होते़ (प्रतिनिधी)
‘हू वॉज शिवाजी’चे पुनर्प्रकाशन
रविवारी झालेल्या ‘मॉर्निंग वॉक’मध्ये गोविंद पानसरेलिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती ‘हू वॉज शिवाजी’चे पुनर्प्रकाशन प्राचार्य टी़ एस़ पाटील यांच्या हस्ते झाले़ या पुस्तकाचा अनुवाद उदय नारकर यांनी केला असून दिल्ली येथील लेफटवर्ड या प्रकाशनाने हे पुस्तक पानसरे यांच्या हत्येनंतर प्रकाशित केले आहे.
प्राचार्य टी़ एस़ पाटील म्हणाले, पानसरेंनी ब्रिटिश, पर्शियन, पोर्तुगीज काळात शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिलेल्या संदर्भपूर्ण पुस्तकांची सुमारे दहा हजार पाने वाचून ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक पानसरेंनी लिहिलेले आहे.
समीरची आई सांगलीत परतली
सांगली : कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडची आई शांताबाई गायकवाड या रविवारी सांगलीत घरी परतल्या. गेल्या चार दिवसांपासून त्या कोल्हापुरात होत्या.
पानसरेंच्या हत्येप्रकरणी समीरला गेल्या आठवड्यात सांगलीत अटक केली होती. तेव्हापासून त्याची आई कोल्हापुरात होती. रविवारी सायंकाळी त्यांच्या घरी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी आम्हाला कोणाशी बोलायचे नाही, असे सांगून दरवाजा आतून बंद करून घेतला.
त्यांच्या घराजवळ पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. सुरुवातीला एक पोलीस तैनात होता; पण रविवारपासून दोन पोलीस तैनात केले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक सांगलीत येणार असल्याची चर्चा सुरू राहिल्याने सांगली पोलीस सतर्क झाले होते.