सांगलीतील पंचरंगी लढतीने राजकीय समीकरणे बदलली
By Admin | Updated: September 26, 2014 23:29 IST2014-09-26T23:02:18+5:302014-09-26T23:29:47+5:30
संभाजी पवार शिवसेनेसोबत : राष्ट्रवादीच्या हालचाली गतिमान; दिग्गज उमेदवारांमुळे लक्षवेधी लढत

सांगलीतील पंचरंगी लढतीने राजकीय समीकरणे बदलली
अशोक डोंबाळे - सांगली --महायुती आणि आघाडीचा घटस्फोट झाल्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. दुरंगी, तिरंगी लढतीचे चित्र पंचरंगी लढतीपर्यंत पोहोचले आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसेचे उमेदवार निश्चित झाले असून राष्ट्रवादीची उमेदवारी अद्याप घोषित नाही. पंचरंगी लढतीत कोण कोणाची मते घेणार आणि कोण कोणाबरोबर राहणार, याचे गणित जमविण्यात उमेदवारांची कसोटी लागणार आहे.
मागील विधानसभा निवडणुकीतील चुकलेल्या गणितामुळे यंदा काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच मदन पाटील यांनी राष्ट्रवादीवर टीका करून त्यांचा पाठिंबा गृहित धरत नसल्याचे सांगून फारकत घेतली होती. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, दिनकर पाटील यांच्यावर आरोप करून त्यांनी, आघाडी फुटण्यापूर्वीच राष्ट्रवादीला लक्ष्य केले होते. गुरुवारी आघाडी संपुष्टात येताच राष्ट्रवादीतील हालचाली गतिमान झाल्या. दिनकर पाटील, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील यापैकी एकाच्या नावावर उद्या (शनिवारी) सकाळपर्यंत शिक्कामोर्तब होईल. मात्र सांगली शहरातील पदाधिकाऱ्यांच्या दोन गटातील धुसफूस टोकाला गेली आहे. एका गटाला उमेदवारी दिल्यास दुसरा गट दुखावला जाणार असून, त्यांची समजूत काढणे जयंत पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
भाजपकडून विद्यमान आमदार संभाजी पवार, त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवार, सुधीर गाडगीळ, नीता केळकर, धनपाल खोत, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांनी उमेदवारीची मागणी केली होती. पवार प्रबळ दावेदार असले तरी खा. संजय पाटील यांनी तक्रारी केल्याने संभाजी पवारांचा पत्ता कट करण्यात आला आणि गाडगीळ यांना उमेदवारी देण्यात आली. संजय पाटील यांनी शिवाजी डोंगरे यांच्या नावाचीही शिफारस केली होती. परंतु, डोंगरेंचा पत्ता कट झाल्यामुळे तेही नाराज आहेत. भाजप उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय डोंगरे यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये उलट-सुलट चर्चा आहे. पवारांनी पृथ्वीराज यांच्यासाठी शिवसेनेची उमेदवारी घेतली आहे. पवार शिवसेनेबरोबर गेल्यामुळे धनुष्यबाणाची शक्ती वाढली आहे. पवार भाजपमधून बाहेर पडल्यामुळे या निवडणुकीत भाजपसह सुधीर गाडगीळ यांचीही कसोटी लागणार आहे. शिवसेनेकडून सांगलीतून बजरंग पाटील यांचेही नाव पुढे आले होते. मात्र अखेर सेनेला उमेदवार आयात करावा लागला आहे. मनसेकडून अॅड. स्वाती शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
पंचरंगी लढतीमधील उमेदवार
काँग्रेस- मदन पाटील
भाजप- सुधीर गाडगीळ
राष्ट्रवादी- दिनकर पाटील, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील यापैकी एक
शिवसेना- पृथ्वीराज पवार
मनसे- अॅड्. स्वाती शिंदे
डावी आघाडी रिंगणातून बाहेर
सांगली मतदारसंघात कष्टकरी, हमाल, मजुरांची संख्या मोठी आहे. या मतदारांचा कौल नेहमीच डाव्या आघाडीच्या बाजूने राहिला आहे. परंतु, यंदा प्रथमच डाव्या आघाडीचा उमेदवार उभा राहणार नसल्याचे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील, शेकापचे नेते अॅड्. अजित सूर्यवंशी यांनी जाहीर केले. तुल्यबळ उमेदवार मिळत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.