मुंबईत राजकीय वादावादी
By Admin | Updated: March 2, 2017 02:04 IST2017-03-02T02:04:55+5:302017-03-02T02:04:55+5:30
मुंबईतील राजकीय वादावादी चांगलीच वाढताना दिसते आहे.

मुंबईत राजकीय वादावादी
मुंबई : मुंबईतील राजकीय वादावादी चांगलीच वाढताना दिसते आहे. पूर्व उपनगरातील वाद तर टोकाला पोहोचला आहे. बुधवारी क्षुल्लक वादातून घाटकोपरच्या भटवाडी परिसरात शिवसेना आणि भाजपामध्ये राडा झाला. या राड्यामुळे घाटकोपर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह १० जणांना दंगलीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडी परिसरात रिक्षाचालकाने शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला दमदाटी करत, गाडीसमोरून बाजूला व्हायला सांगितले. याच रागात दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची रंगली. रिक्षाचालकाने भाजपा कार्यकर्ता असलेल्या मुलाला बोलावून घेतले. घाटकोपरमध्ये भाजपाला हवे तसे यश न मिळाल्याने त्यांच्यात राग होताच. अशात याच संधीचा फायदा घेत भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे जमले. त्यात सेनेच्या कार्यकर्त्यांची गर्दीही वाढली. दोन्ही पक्षांमधील शाब्दिक बाचाबाची हाणामारीत उतरली. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह १० जणांना ताब्यात घेतले. यामध्ये भाजपाचे प्रवीण विचारे, तर सेनेचे बाबू साळुंखेसह १० जणांचा समावेश आहे. या १०जणांना दंगलीच्या गुन्ह्यात अटक करण्याती आली असल्याची माहिती, घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांनी दिली.
मुलुंडमध्ये भाजपाच्या सहाही जागा निवडून आल्यामुळे मतमोजणीवर संशय निर्माण करण्यात आला. त्यात एका अपक्ष उमेदवाराला तर चक्क शून्य मत पडल्यामुळे संशयाची सुई आणखीनच बळावली. याच रागात मुलुंडमध्ये सर्वपक्षीयांनी मोर्चा काढत, पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली. यामुळे मुलुंडच्या कालिदास येथील मतमोजणी केंद्रातून ईव्हीएम मशिन हटविण्यात आलेले नाही. त्यांच्यावर निवडणूक अधिकारी यांच्यासह पोलिसांचे लक्ष आहे.
यात धक्कादायक बाब म्हणजे, मतदानाच्या दिवशी मुंबईत ७ ठिकाणी अदखलपात्र गुन्हे दाखल झाले. यामध्ये ‘भाई को ही वोट देना’, उमेदवाराच्या नावाची टोपी घालून वावरणे, अशात शाब्दिक बाचाबाची अशा अनेक गुन्ह्यांना पेव फुटले होते. या प्रकरणी पंतनगर, वरळी, मानखुर्द, अँटॉपहिल, विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती, तर अँटॉपहील पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही प्रकरणे निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणे गरजेचे होते. मात्र, त्यापैकी बरेचशा प्रकरणे पोलिसांनी त्यांच्या पातळीवरच मार्गी लावल्याची माहिती मिळते.
मतमोजणीच्या निकालानंतर हल्ल्यात वाढ झाली. कुर्ला येथील मनसेचे विजयी उमेदवार संजय तुर्डे यांच्यावर पराभव झालेल्या भाजपा उमेदवाराने हल्ला चढविला आला. त्या हल्ल्यात त्यांची प्रकृति स्थिर असून, पसार आरोपींचा शोध सुरू आहे. हे प्रकरण आणखीनच तापण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
>सेनेकडून मतदारांसाठी व्हॉट्सअप सेवा
मतदार यादीतून गायब झालेल्या मतदारांसाठी शिवसेनेचा व्हॉट्सअप क्रमांक सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात त्यांनी ज्यांचे नाव नसेल, त्यांना माहिती देण्याचे आवाहन केले. जेणेकरून ती एकत्रित तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडे करता येणार आहे.
भांडुपचे मनसैनिकही न्यायालयाच्या वाटेवर
भांडुपमधील मनसेचा गड पूर्णत: कोलमडल्याने येथील मनसे उमेदवारही न्यायालयात धाव घेणार आहेत. लवकरच ते मतमोजणी प्रक्रियेतील घोळाविरुद्ध न्यायालयात जाणार आहेत.
अहो, माझे मत कुठे गेले ?
मुलुंडच्या प्रभाक क्रमांक १०६ मधून हरिकृष्णा चेट्टीयार अपक्ष म्हणून उभे होते. मतमोजणीच्या निकालात त्यांना चक्क शून्य मते पडल्याने त्यांना धक्काच बसला. अहो, माझे स्वत:चे मत कुठे गेले? असा प्रश्न त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केला आहे.
तर दुसरीकडे मतमोजणी सुरू असतानाच, सकाळी साडेअकरा वाजता भाजपा खासदार किरीट सोमय्या सहाच्या सहा जागांवरचा विजय कसा घोषित करू शकतात? असाही सवाल उपस्थित करत, मंगळवारी मुलुंडच्या सर्व पक्षीयांनी मोर्चा काढला. मुलुंड पोलिसांकडेही लेखी तक्रार दिली. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला आहे.