‘सीरम’मुळे पोलिओला कायमस्वरूपी उत्तर
By Admin | Updated: November 10, 2014 03:56 IST2014-11-10T03:56:31+5:302014-11-10T03:56:31+5:30
जगभरातील पोलिओ विकाराला कायमस्वरूपी उत्तर देण्याची कामगिरी डॉ. सारयस पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने केली.

‘सीरम’मुळे पोलिओला कायमस्वरूपी उत्तर
पुणे : जगभरातील पोलिओ विकाराला कायमस्वरूपी उत्तर देण्याची कामगिरी डॉ. सारयस पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने केली. याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी डॉ. पूनावाला यांच्या कार्याचा गौरव केला. त्रिदल संस्थेच्या पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे डॉ. पूनावाला यांना पवार व इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर अध्यक्षस्थानी होते.
एक लाख रूपये, स्मृतीचिन्ह असे स्वरूप असलेल्या या पारितोषिकात १० लाख रूपयांची भर घालून पूनावाला यांनी ११ लाख रूपयांचा धनादेश कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्याकडे सुपूर्द केला. कष्टकरी महिलांच्या कार्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. पवार म्हणाले, देशासह जगातील पोलिओचे प्रमाण अलिकडे कमी झाले आहे. जगातल्या ४२ देशांमध्ये पूनावाला यांनी तयार केलेली लस जाते. जगात जन्मणाऱ्या ३ पैकी २ बालकांना सीरमची लस दिली जाते. पूनावाला म्हणाले, कमी किमतीत रोगप्रतिबंधक लसी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सर्वात प्रथम भारत सरकारला दिला होता. नव्या पंतप्रधानांनी तरी त्या प्रस्तावाबद्दल विचार करावा. सर्वांना परवडणारे संशोधन प्रत्यक्षात आणण्याचे उदाहरण पूनावाला यांनी घालून दिले आहे, असे डॉ. माशेलकर यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)