पोलिसाची दबंगगिरी
By Admin | Updated: October 24, 2015 01:30 IST2015-10-24T01:30:44+5:302015-10-24T01:30:44+5:30
पोलीस आयुक्तांपासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंत अधिकारी नागरिकांशी सौजन्याने वागत असताना दुसरीकडे कर्मचारी मात्र अनेक वेळा उद्धट वर्तणूक करीत असल्याचे निदर्शनास

पोलिसाची दबंगगिरी
नवी मुंबई : पोलीस आयुक्तांपासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंत अधिकारी नागरिकांशी सौजन्याने वागत असताना दुसरीकडे कर्मचारी मात्र अनेक वेळा उद्धट वर्तणूक करीत असल्याचे निदर्शनास येत असते. परिमंडळ एकचे उपायुक्त यांच्या कार्यालयामध्ये एका कर्मचाऱ्याने किरकोळ कारणावरून चक्क भेटण्यासाठी येणाऱ्यांशी उद्धट वर्तणूक केल्याचा व मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी घडला आहे.
नवी मुुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना चारसूत्री कार्यक्रम ठरवून दिला आहे. यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या सामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे, या सूचनेचाही समावेश आहे. स्वत: आयुक्त प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे व्यवस्थित ऐकूण घेतात. सर्वच उपायुक्त, साहाय्यक आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नागरिकांशी चांगले वर्तन करीत असताना पाहावयास मिळते. परंतु कनिष्ठ अधिकारी व इतर कर्मचारी अनेक वेळा उद्धटपणे वागत असल्याचे निदर्शनास येते. परिमंडळ एकचे उपायुक्त शहाजी उमाप यांच्या कार्यालयामध्ये जगदाळे नावाच्या कर्मचाऱ्याने उपायुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीशी उद्धट वर्तन केले. ओळख नसलेल्यांशी अरे-तुरेच्या भाषेत बोलण्यास सुरुवात केली. पोलीस उपायुक्तांच्या कार्यकाळाविषयी माहिती फलकावरील अधिकाऱ्यांची नोंद ठेवण्यासाठी छायाचित्र काढले असता संबंधिताने सदर व्यक्तीला दम देण्यास सुरुवात केली.
उपायुक्तांच्या कार्यालयातच तुला येथेच मारेन, काय समजतोस मला, अशाप्रकारचे शब्द वापरण्यास सुरुवात केली. उपायुक्तांच्या दालनात जाऊन साहेब या व्यक्तीला मी फटके देईन, असे वक्तव्य केले. वास्तविक पोलीस कर्मचाऱ्यांना कोणालाही मारण्याची परवानगी नाही. एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केली तरी त्यालाही मारण्याची परवानगी कायद्यात नाही. तरीही उपायुक्त कार्यालयामध्येच कर्मचारी गुंडगिरीची भाषा वापरू लागले आहेत.
वास्तविक जर कोणी नागरिकाने छायाचित्र काढले तर त्याविषयी रीतसर काही कारवाई असेल तर ती करता येऊ शकते. परंतु तसे न करता कायदा हातात घेण्याची भाषा वापरणाऱ्या या कर्मचाऱ्याविषयी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली जाणार आहे. (प्रतिनिधी)