चोरट्यांच्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू
By Admin | Updated: November 17, 2014 04:21 IST2014-11-17T04:21:04+5:302014-11-17T04:21:04+5:30
चोरट्यांना पकडण्यासाठी गेलेल्या डोंगरी पोलीस ठाण्यातील अजय गावंड (४३) या पोलीस शिपायावर चोरट्यांनीच हल्ला केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

चोरट्यांच्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू
मुंबई : चोरट्यांना पकडण्यासाठी गेलेल्या डोंगरी पोलीस ठाण्यातील अजय गावंड (४३) या पोलीस शिपायावर चोरट्यांनीच हल्ला केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. यामध्ये या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला असून, त्यांच्या या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुळचे मुलुंड येथील राहणारे गावंड २० वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते डोंगरी पोलीस ठाण्यातील डिटेक्शन विभागात काम करीत होते. काल रात्रपाळी असल्याने पोलीस ठाण्यातच असताना वाडीबंदर येथील पी. डी. रोड परिसरातील भारत पेट्रोलियम इमारतीत चोर शिरल्याची महिती डोंगरी पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली.
याच परिसरात गस्त घालणारे दोन पोलीस शिपाई त्या ठिकाणी पोहोचले. मात्र पोलिसांनी पाहताच संतोष साळवी (३५) या चोरट्याने इमारतीच्या छताकडे धाव घेत छताचा दरवाजा बंद केला. त्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी जाता येत नव्हते. त्यातच आरोपीने पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केल्याने पोलीस शिपायांनी पोलीस ठाण्यात फोन करून अधिक मनुष्यबळ पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार डिटेक्शनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात आणि गावंड तसेच अन्य तीन शिपाई घटनास्थळाकडे रवाना झाले. या पथकातील काही पोलिसांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी गावंड यांनी येथील एका रहिवाशाची मदत घेत एका घराच्या खिडकीतून टेरेसवर प्रवेश केला. पोलीस टेरेसवर पोहोचल्याने सर्वच मार्ग बंद झाल्याचे या चोरट्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तो पळू लागला. याच दरम्यान गावंड यांनी त्याच्यावर झडप घालताच चोरट्याने बाजूलाच पडलेल्या लाकडी बांबूने गावंड यांच्यावर हल्ला केला. (प्रतिनिधी)