आगारातील बेकायदा वाहनांना पोलीस रोखणार
By Admin | Updated: February 11, 2015 05:41 IST2015-02-11T05:41:20+5:302015-02-11T05:41:20+5:30
एसटी आगार आणि स्थानक परिसरात घुसखोरी करुन बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांना रोखण्याचा निर्णय

आगारातील बेकायदा वाहनांना पोलीस रोखणार
मुंबई : एसटी आगार आणि स्थानक परिसरात घुसखोरी करुन बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांना रोखण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. यासाठी जवळपास ५०० ते १००० पोलिसांची
मदत घेण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासाठी संबंधित विभागांकडे बोलणीही सुरु असल्याचे ते
म्हणाले. यामुळे बेकायदेशीर वाहनांना आळा बसण्याबरोबरच एसटीचे उत्पन्नही वाढण्यास मदत मिळणार आहे.
एसटी आगार आणि स्थानकाच्या २०० मीटर परिसरात बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही खाजगी आणि अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांना पायदळी तुडवत आगार आणि स्थानक परिसरात घुसखोरी केली जाते. हे घुसखोर कमी भाड्याचे आमिष दाखवून प्रवासी वाहतुक करतात. याविषयी रावते म्हणाले, परिवहन विभाग, पोलीस आणि एसटीने एकत्र येऊन आपले अधिकार वापरले पाहिजे. आता या अनधिकृत आणि खाजगी वाहनांना आळा घालण्यासाठी आता ५०० ते १००० हजार पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे.
यासाठी संबंधित विभागाकडे मागणीही केली आहे. त्याचप्रमाणे या वाहनांना रोखण्यासाठी आरटीओंना कार्ड रिडींग मशिनही दिले जाणार आहे. यापुर्वी कारवाई करण्यात आलेल्या वाहनांची माहीती संबंधित विभागाकडे ठेवता येत नव्हती. पण आता या मशिनच्या मदतीने
वाहन चालकाकडून यापूर्वी किती गुन्हे झाले आहेत ही आणि अशा अनेक माहीती याव्दारे साठवल्या जातील. त्याचा एसटी आगार आणि स्थानक परिसरात येणाऱ्या खाजगी आणि अनधिकृत वाहनांविरोधातही केला जावू शकतो, अशी माहीती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)