भंगार विक्रेत्यांवर पोलिसांचा वॉच
By Admin | Updated: August 2, 2014 03:06 IST2014-08-02T03:06:27+5:302014-08-02T03:06:27+5:30
शीळ-डायघर या परिसरात भंगार विक्रेत्यांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असून, तेथील कामगार हे प्रशिक्षित नसल्याने बॉयलर स्फोट आणि वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडर स्फोट

भंगार विक्रेत्यांवर पोलिसांचा वॉच
पंकज रोडेकर, ठाणे
शीळ-डायघर या परिसरात भंगार विक्रेत्यांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असून, तेथील कामगार हे प्रशिक्षित नसल्याने बॉयलर स्फोट आणि वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडर स्फोट यांसारख्या घटना घडत आहेत. अशा घटना भविष्यात घडू नयेत, तसेच कामगारांनी ते कशा प्रकारे हाताळाव्यात यासाठी ठाणे शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत केमिकल आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत त्या कामगारांमध्ये जनजागृती करून भंगार विक्रेत्यांची नोंदणी करून त्यांच्यावर विशेष वॉच ठेवला जाणार आहे.
मुंब्य्रातील शीळ-डायघर हा परिसर ठाणे आणि नवी मुंबई तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सीमेवर वसलेला असून, तेथील लोकसंख्याही सुमारे अडीच लाखांच्या घरात पोहोचलेली आहे. त्यातच या परिसरात दिवसेंदिवस भंगार विक्रेत्यांची संख्या वाढत असून, त्यांचीही ना महापालिका ना सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे कोणत्याही प्रकारची नोंद आहे.
येथील विक्रेत्यांकडे आजूबाजूच्या परिसरातील केमिकल कंपनीतून भंगारात काढलेले कंटेनर आणून त्यांची विल्हेवाट लावली जाते. मात्र, त्याचे विल्हेवाट लावणाऱ्या त्या कामगारांना हे कसे हाताळावेत याबाबत कोणतेही ज्ञान नसल्यानेच मागील काही महिन्यांमध्ये केमिकल बॉयलर आणि वेल्डींग गॅस सिलिंडर स्फोटासारख्या घटना घडत आहेत.
याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी कामगार आणि तेथील जनेतच्या सुरक्षितेसाठी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेंतर्गत पोलिसांनी शीळ डायघर परिसरातील भंगार विक्रेत्यांचा सर्व्हे करून त्यांची नोंद करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्या कामगारांना त्याचे योग्य प्रशिक्षण देण्याबाबत काही केमिकल कंपनीच्या व्यवस्थापन विभागांशी संपर्क साधल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.