पोलिसांनी स्वागत कक्ष काढला
By Admin | Updated: May 21, 2016 02:24 IST2016-05-21T02:24:16+5:302016-05-21T02:24:16+5:30
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या समोरील पदपथावर खांदेश्वर पोलिसांनी स्वागत कक्ष बांधून अतिक्रमण केले होते

पोलिसांनी स्वागत कक्ष काढला
कळंबोली : खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या समोरील पदपथावर खांदेश्वर पोलिसांनी स्वागत कक्ष बांधून अतिक्रमण केले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करून दिव्या खालील अंधार उजेडात आणला होता. या वृत्ताची चर्चा झाली त्याचबरोबर प्रतिक्रिया आल्या. याशिवाय याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी स्वागत कक्ष काढून घेवून पदपथ मोकळा करून दिला.
इमारत नसल्याने खांदेश्वर पोलीस ठाण्याचा कारभार चौकीतून सुरू आहे. अतिशय कमी जागा असताना पोलिसांनी वरती इमले चढवले आहेत. या ठिकाणी कसेबसे पोलीस ठाणे सुरू असून महिन्याला बैठक व्यवस्था बदलावी लागते. नवीन पनवेल येथे भूखंड आरक्षित असला तरी तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी पोलीस ठाण्याची इमारत अद्याप होवू शकलेली नाही. असे असताना पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वागत कक्ष असावा त्या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन झाले की नाही याबाबत नोंद करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वागत कक्ष बांधण्याचे काम सुरू आहे. ‘लोकमत’ने या विषयावर १७ मे च्या अंकात ‘खांदेश्वर पोलिसांचे पदपथावर अतिक्रमण’ असे वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुध्दा घेतली. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी पदपथावर टाकलेले शेड बुधवारी रात्री काढून टाकले. (वार्ताहर)