पोलिसाकडूनच हवालदारालाच धमकी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 05:11 IST2017-03-02T05:11:31+5:302017-03-02T05:11:31+5:30
पोलीस हवालदाराला अन्य एका पोलिसानेच त्याच्या घरी जाऊन शिवीगाळ करत समाजसेवा करु नकोस, असे धमकाविण्याचा धक्कादायक प्रकार

पोलिसाकडूनच हवालदारालाच धमकी !
मुंबई : पोलीस दलातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारावर आवाज उठविणाऱ्या पोलीस हवालदाराला अन्य एका पोलिसानेच त्याच्या घरी जाऊन शिवीगाळ करत समाजसेवा करु नकोस, असे धमकाविण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी वरळीतील पोलीस वसाहतीत घडला. भरत सीताराम आगवणे असे धमकी देणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. आगवणेविरुद्ध हवालदार सुनील टोके यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गणवेषात एका पोलिसाच्या घरात जाऊन धमकावण्याच्या या अजब प्रकाराची चर्चा दिवसभर पोलीस वर्तुळात होती. आगवणेनींदेखील टोके यांना शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे.
वाहतूक शाखेतील भ्रष्टाचाराविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे सुनील टोके सशस्त्र दल (एल-३) वरळी येथे कार्यरत आहेत. आगवणेही याच ठिकाणी नियुक्तीला आहेत. पोलीस हवालदार तुषार तिऊरवडे व संतोष कदम यांनी एका तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना ‘लोकमत’ने आधीच चव्हाट्यावर आणली आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या तरुणीच्या तक्रारीची दखल घेतली आहे. टोके हे पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करत आहेत. त्याबाबत फेसबुकवर पोस्ट टाकत असल्याने हवालदार आगवणे हे गणवेषात सकाळी पावणेदहाच्या सुमारास वरळी पोलीस वसाहतीतील टोके यांच्या घरी गेले. त्यावेळी टोके यांना शिवीगाळ करीत पत्नी आणि मुलाकडे त्यांच्याबद्दल विचारणा केली. आवाजाने टोके आतून बाहेर आले असता, ‘तुला पोलीस खात्यात नोकरी करायची नाही का? भ्रष्टाचार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात का भांडत आहेस, पीडित तरुणीला मदत करु नकोस अन्यथा तुला बघून घेऊ, समाजसेवेचा नाद सोडू दे, अन्यथा अनेक आरटीआय कार्यकर्ते, समाजसेवक यांचे काय झाले माहित आहे ना?’, अशा थेट धमक्या दिल्या. या धमकावण्यामुळे चिडून टोके यांचा मुलगा प्रणव व शेजाऱ्यांनी त्याला दरडावून जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर आवगणे तेथून निघून गेले.
हवालदार टोके यांनी तातडीने हा प्रकार वरिष्ठ निरीक्षक व उपायुक्तांना सांगून त्यांच्या सुचनेनुसार वरळी पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलीस आयुक्तालयात जाऊन आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना भेटण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांचे रिडर निरीक्षक अनावकर यांनी तुम्ही रितसर अर्ज द्या, असे सांगून त्यांना परत पाठवून दिले. (प्रतिनिधी)
>शिवीगाळ केली
गणवेषात एका पोलिसाच्या घरात जाऊन धमकावण्याच्या या अजब प्रकाराची चर्चा दिवसभर पोलीस वर्तुळात होती. आगवणेनींदेखील टोके यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे.