पोलीसच घेताहेत पोलिसाचा शोध

By Admin | Updated: February 15, 2016 03:57 IST2016-02-15T03:57:09+5:302016-02-15T03:57:09+5:30

वरिष्ठांकडून दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त कामामुळे हैराण झालेल्या एका परिविक्षाधीन (प्रोबेशनगरी) पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्येचा इशारा देणारे निनावी पत्र पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना पाठवले आहे.

Police search for taking policemen | पोलीसच घेताहेत पोलिसाचा शोध

पोलीसच घेताहेत पोलिसाचा शोध

जमीर काझी,  मुंबई
वरिष्ठांकडून दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त कामामुळे हैराण झालेल्या एका परिविक्षाधीन (प्रोबेशनगरी) पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्येचा इशारा देणारे निनावी पत्र पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना पाठवले आहे. महासंचालकांनी तातडीने दखल घेऊन मुंबईतील १२ही परिमंडळांच्या पोलीस उपायुक्तांना त्या पोलिसाचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.
आपल्या हद्दीतील विभागाचे सहायक आयुक्त (एसीपी) व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना (सीनियर पीआय) प्रोबेशनरी उपनिरीक्षकांवर वॉच ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून शहर व उपनगरातील सर्व पोलीस ठाण्यांत विशेष दक्षता घेतली जात आहे.
मुंबईतील ९२ पोलीस ठाण्यांत सुमारे ३ हजारांवर पोलीस उपनिरीक्षक आहेत. परिविक्षाधीन अधिकारी ४००वर आहे. त्यामुळे आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पीएसआयचा कसा शोध कसा घ्यायचा, या विवंचनेत वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे ते सर्वच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी कधी नव्हे इतक्या आपुलकीने
वागत आहेत.
प्रोबेशनरीची कैफियत
या पत्रानुसार ठाणे अंमलदार गंभीर गुन्ह्यांचा तपास, अपमृत्यू प्रकरण, तक्रार अर्ज अशी महत्त्वाची कामे प्रोबेशनरी अधिकाऱ्यांवर सोपवतात. त्यामुळे त्यांना खूप मानसिक तणाव सहन करावा लागत आहे. अनुभव नसूनही वरिष्ठांकडून येणाऱ्या कामाच्या दडपणामुळे मानसिक तणाव वाढत आहे. ज्या हेतूने खात्यात भरती झालो होतो, ती मानसिकता आता राहिलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
त्यामुळे आत्महत्येचे विचार मनात घोळू लागल्याचे या अधिकाऱ्याने पत्रात म्हटले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रोबेशनरींना अंमलदाराची ड्युटी व गुन्ह्याचा तपास दिला जाऊ नये, अशी विनंतीही त्यांनी पत्रात केलेली आहे. त्यामुळे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना पत्राद्वारे सूचना करून तातडीने खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

Web Title: Police search for taking policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.