पोलिसांचे पगारपत्रक आता मोबाईलवर!

By Admin | Updated: December 21, 2014 00:17 IST2014-12-21T00:17:51+5:302014-12-21T00:17:51+5:30

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात अद्ययावत (अपटूडेट) राहण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. त्यात आता पोलीससुद्धा मागे नाही. पगार जमा होताच येणाऱ्या एसएमएसद्वारे केवळ किती पैसे जमा झाले हे माहिती पडते.

Police salaries now on mobile! | पोलिसांचे पगारपत्रक आता मोबाईलवर!

पोलिसांचे पगारपत्रक आता मोबाईलवर!

नागपूर ग्रामीण पोलिसांचा उपक्रम : विदर्भातील पहिलाच प्रयोग
गणेश खवसे - नागपूर
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात अद्ययावत (अपटूडेट) राहण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. त्यात आता पोलीससुद्धा मागे नाही. पगार जमा होताच येणाऱ्या एसएमएसद्वारे केवळ किती पैसे जमा झाले हे माहिती पडते. त्यापुढे एक पाऊल टाकत पूर्ण पगारपत्रक (पे स्लिप) एसएमएसद्वारे पाठविण्याचा उपक्रम नागपूर ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे. विदर्भातील हा पहिलाच प्रयोग आहे, हे विशेष! नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे.
इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांचासुद्धा पगार बँकेत जमा होतो. त्यानंतर त्यांना एक एसएमएस येतो. त्यात केवळ आपल्याला या महिन्यात किती पैसे मिळाली याचीच माहिती मिळते. त्यानंतर ग्रामीण पोलिसांना संबंधित पोलीस ठाण्यात टपालाद्वारे पगारपत्रक पाठविण्यात येत होते. यात जवळपास आठवडाभराचा वेळ निघून जातो. त्यातच पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तात, एखाद्या शोध मोहिमेवर असल्यास त्यांना १५-२० दिवसांनंतरच पगारपत्रक पाहण्यास मिळते. यामुळे आॅनलाईन अर्थात मोबाईलवर पगारपत्रक पाठविता येणे शक्य आहे का, यादृष्टीने चाचपणी करण्यात आली. त्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना यश आले. आता नागपूर जिल्ह्यातील पोलिसांना त्यांच्या मोबाईलवरच पूर्ण पगारपत्रक पाठविण्यात येत आहे.
मोबाईलवर आलेल्या पगारपत्रकाच्या एसएमएसमध्ये बेसिक, जीपी (ग्रेड पे), डीए (डिनर अलाऊंस), एचआर (हाऊस रेंटल), एलएफ, डब्ल्यूए (वॉशिंग अलाऊंस), इएम, टीए (ट्रॅव्हल अलाऊंस), जीएल, एफए (फेस्टिवल अलाऊंस), जीआयएस (जनरल एन्शुरन्स स्किम), डीडी, टीपी, एसओ, एलसी (लिव्ह कॅश), डीके, एनजी आणि नेट वेतन याप्रकारे हे पगारपत्रक सध्या नागपूर ग्रामीण पोलिसांच्या मोबाईलवर येत आहे.
अशी सूचली कल्पना
या उपक्रमाबाबत सांगताना पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह म्हणाल्या, बँकेत पगार जमा झाल्याबरोबर एसएमएस येतो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा कुठे उपयोग केला तर पैसे कपात झाल्याचा एसएमएस येतो. मग पगारपत्रकच एसएमएसद्वारे पाठविता येऊ शकते का यादृष्टीने विचार करण्यात आला. कारण नागपूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे लांब अंतरावर आहे. त्यांना पगारपत्रक टपालाने पाठविल्यास कित्येक दिवसांचा विलंब होत होता. पगाराची कपात आणि वाढ कुठे झाली, हे कळण्यास पोलिसांना बराच दिवसांचा कालावधी लागत. हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यात आम्हाला यश येऊन पगार जमा होण्याच्या बँकेच्या एसएमएससोबतच पगारपत्रकही पोलिसांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे नागपूर ग्रामीण पोलिसांचा त्रास कमी झाला, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.

Web Title: Police salaries now on mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.