पांगरमल दारूकांडाला पोलीसच जबाबदार
By Admin | Updated: March 1, 2017 05:25 IST2017-03-01T05:25:42+5:302017-03-01T05:25:42+5:30
पांगरमल येथील दारूकांडाला पोलीसच जबाबदार आहेत

पांगरमल दारूकांडाला पोलीसच जबाबदार
अहमदनगर : पांगरमल येथील दारूकांडाला पोलीसच जबाबदार आहेत. तोफखाना पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून दारू पुरवठा होत असल्याचा छडा पोलिसांना कसा लागला नाही? ही पोलिसांचीच चूक आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. लवकरच जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी होईल, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकारांना दिली.
बनावट दारू बनविणाऱ्यांकडे राज्य शासनाचे लक्ष नाही. त्यामुळे उत्पादन शुल्क आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली
पाहिजे, अशी मागणी माझ्यासह पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी
लावून धरली आहे. त्यामुळेच उत्पादन शुल्क खात्याचे काही अधिकारी निलंबित झाले आहेत. नगरचे नाव बदनाम झाले आणि निरपराध लोकांचा जीव गेला. त्याला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला आहे. ते
योग्य कारवाई करतील. यामध्ये दोषी कोण त्याचा निवाडा मुख्यमंत्रीच करतील, असेही गांधी यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी नाशिक
परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौभे यांनी नगरमध्ये घेऊन पांगरमल दारूकांडाचा आढावा घेतला़ होता चौभे यांनी दुपारी पोलीस अधीक्षक डॉ़ सौरभ त्रिपाठी, अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्यासह इतर
वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती़ (प्रतिनिधी)