पोलिसांच्या खबऱ्यांची ‘दिवाळी’

By Admin | Updated: October 27, 2014 02:34 IST2014-10-27T02:34:28+5:302014-10-27T02:34:28+5:30

पोलिसांना खबर देण्यासाठी आलेल्यांची गर्दी सध्या बहुतेक पोलीस ठाण्यांच्या आवारात दिसत आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध युनिटला टीप देण्याकडे या खब-यांचा कल आहे

Police records 'Diwali' | पोलिसांच्या खबऱ्यांची ‘दिवाळी’

पोलिसांच्या खबऱ्यांची ‘दिवाळी’

ठाणे : पोलिसांना खबर देण्यासाठी आलेल्यांची गर्दी सध्या बहुतेक पोलीस ठाण्यांच्या आवारात दिसत आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या विविध युनिटला टीप देण्याकडे या खब-यांचा कल आहे. कोणी केवळ मैत्रीसाठी तर कोणी दोन पैसे मिळवण्यासाठी खबरी होत आहेत. पोलीसही दिवाळीनिमित्त खब-यांना पदरमोड करून बक्षीस देत आहेत. त्यामुळे खबऱ्यांची ‘दिवाळी’ झाली आहे.
पोलिसांचे खबरी सामान्य नागरिकांमध्ये मिसळून पोलिसांसाठी इमानेइतबारे काम करतात. अशीच काही मोठी खबर मिळाली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून खबऱ्यांना शासनाच्या ‘खबरी फंडा’मधून बक्षीस देण्याची सुविधा आहे. पण बरेचदा अधिकृत फंड मिळेपर्यंत खबरी धीर धरीत नाहीत. तो लगेच इतरत्र जातो. त्यामुळे कधी कधी पदरमोड करूनही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपला खबरी जपतात.
सध्या सोनसाखळी चोरट्यांनी ठाणे पोलिसांना आव्हान दिले आहे. त्यांना पकडण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी खबऱ्यांचे जाळे पसरवले आहे. काहींना केवळ जेवण दिले तरी चालते. काहींना मात्र लगेच काही हजारांच्या रकमेची अपेक्षा असते. आपला खबरी इतरत्र जाऊ नये म्हणून या खबऱ्यांची पोलीस खातीरदारी करीत आहेत. आज खबर मिळाली नाही तरी कधी तरी हा खबरी उपयोगी पडेल, यासाठी सणावारांच्या काळात पोलीस त्याला बक्षीस देऊन खूश ठेवतात, असे गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
काही खबरे हे पक्की टीप देतात. गुन्हे अन्वेषण विभागाचे वागळे इस्टेट युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शहाजी जाधव यांनी अलीकडेच सात कोटींचे रक्तचंदन अंबरनाथमधून हस्तगत केले. ही खबर देणाऱ्याने फारशी अपेक्षा ठेवली नाही. त्याच्यासाठी जेवण व इतर खर्च केल्याचे जाधव यांनी सांगितले. तर अमलीपदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी म्हणाले, काही खबरी केवळ दोन-तीन दिवसांचे जेवण सुटावे इतक्या साध्या अपेक्षेने येतात. एखादा खबरी खोटी माहिती देत असेल तर लगेच समजते. पण तरीही त्याकडे आम्ही मुद्दाम दुर्लक्ष करतो. क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी खबऱ्याने मदत केली तर पाच ते दहा हजार रुपये बक्षीस म्हणून द्यावे लागतात. शस्त्र तस्करी किंवा खुनाच्या प्रकरणाची माहिती देणाऱ्यांना मोठ्या मोबदल्याची अपेक्षा असते. ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती पथकाने निवडणूक काळात दोन लाखांच्या बनावट नोटाही खबऱ्यांच्या माहितीच्या आधारेच पकडल्याचे पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Police records 'Diwali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.