पोलीस दलातील बंडाचा डाव उधळला
By Admin | Updated: January 2, 2015 02:41 IST2015-01-02T02:41:47+5:302015-01-02T02:41:47+5:30
राज्यातील वायरलेस यंत्रणा (बिनतारी संदेशवहन यंत्रणा) बंद पाडण्याचा धक्कादायक कट काही कर्मचाऱ्यांनी रचला होता;

पोलीस दलातील बंडाचा डाव उधळला
३१ डिसेंबरच्या रात्रीचा प्रकार : राज्यभरातील वायरलेस यंत्रणा बंद पाडण्याचा प्रयत्न फसला
विनोद काकडे - औरंगाबाद
पोलिसांच्या मागण्या आणि समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला राज्यातील वायरलेस यंत्रणा (बिनतारी संदेशवहन यंत्रणा) बंद पाडण्याचा धक्कादायक कट काही कर्मचाऱ्यांनी रचला होता; परंतु उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अत्यंत समयसूचकतेने हे प्रकरण हाताळल्यामुळे हा डाव उधळला गेल्याचे समजते.
पोलीस दलाच्या वायरलेस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. २००५पासून या विभागासाठी भरतीच झालेली नाही. ६० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. या सर्व बाबींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री बरोबर १२ वाजता (नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला) संदेशवहन यंत्रणा बंद पाडण्याचा कट रचला गेला होता, असे सूत्रांकडून समजते.
गेल्या महिनाभरापासून या बंडाची डाळ शिजत होती. त्याची संपूर्ण तयारीही झाली होती; परंतु ऐनवेळी गृहविभागाला याची कुणकुण लागली अन् उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना आखल्या. त्यामुळे हा कट फसला. जर तो यशस्वी झाला असता तर काही क्षणापुरती का होईना राज्यभरातील अख्खी पोलीस यंत्रणा ठप्प झाली असती. कोठे काय
घडले, घडत आहे, काय करायचे आहे,
याची काहीच माहिती पोलिसांना मिळू शकली नसती.
तीन दशकांपूर्वीही...
तीन दशकांपूर्वी बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री असताना पोलीस दलातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारे बंड करून संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु शासनाने तो हाणून पाडला. त्या वेळी तसा प्रयत्न करणाऱ्यांना शासनाने घरचा रस्ता दाखविला होता. त्यानंतर ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या बंडाचा हा प्रकार उजेडात आल्याने आता पुन्हा पोलीस दलातील असंतोषाला तोंड फुटले आहे.
पोलीस ठाणे, चौक्या, पोलीस
गाड्यांमध्ये असलेली वायरलेस यंत्रणा आॅपरेट करण्यासाठी पोलीस शिपाई नियुक्त केलेला असतो; परंतु शिपायाऐवजी फौजदार दर्जाचे अधिकारी नेमण्याचे आदेश गृहविभागाकडून ३१ डिसेंबरच्या रात्री अचानक देण्यात आले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी ती जबाबदारी पार पाडली.
आम्ही कौशल्याने
परिस्थिती हाताळली
३१ तारखेला असे काही घडणार, याची कुणकुण आम्हाला लागली होती. मात्र आम्ही कौशल्याने परिस्थिती हाताळली आणि असे काहीच घडले नाही.
- डॉ. रणजीत पाटील,
गृहराज्य मंत्री