पारधी तांड्यांवर पोलिसांचे छापे

By Admin | Updated: March 24, 2015 01:04 IST2015-03-24T01:03:45+5:302015-03-24T01:04:07+5:30

पानसरे हत्या प्रकरण : मिरज, कर्नाटकात गुन्हेगारांची धरपकड; चौघे ताब्यात, कसून चौकशी

Police raids on paddy sticks | पारधी तांड्यांवर पोलिसांचे छापे

पारधी तांड्यांवर पोलिसांचे छापे

कोल्हापूर/ सांगली : ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मिरजेतील एका दाम्पत्याने दिलेल्या माहितीच्या आधारे कोल्हापूर पोलिसांनी रविवारी रात्रीपासून मिरज व कर्नाटकातील पारधी तांड्यांवर छापे टाकून संशयित गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. या कारवाईत सांगली पोलिसांना न घेता कोल्हापूर पोलिसांची स्वतंत्रपणे कारवाई सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत चार गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, तपासात मदत होईल, अशी कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. यामुळे धरपकड आणि चौकशीसत्र सुरूच आहे.
फासेपारधी गुन्हेगाराने २५ लाखांची ‘सुपारी’ घेऊन पानसरे यांची हत्या केल्याची माहिती एका दाम्पत्याने दिली असली तरी, पोलिसांचा त्यावर पूर्ण विश्वास नाही. या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असल्याने, जी माहिती मिळेल, तो धागा पकडून पोलीस पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी या दाम्पत्याची विशेष काळजी घेऊन, ज्या फासेपारधी गुन्हेगाराने ‘सुपारी’ घेऊन पानसरे यांची हत्या केली, त्याबद्दल बारकाईने माहिती घेणे सुरू ठेवले आहे. या दाम्पत्याने या गुन्हेगाराचे नावही पोलिसांना दिले आहे. त्याचे मिरज व कर्नाटकात वास्तव्य असल्याने रविवारी रात्री कोल्हापूर पोलिसांची चार पथके मिरजेत दाखल झाली होती. त्यांच्यासोबत हे दाम्पत्यही होते.
पथकाने मिरज तसेच तालुक्यातील पारधी तांड्यांवर छापे टाकले. कर्नाटकातही काही पथके रवाना झाली होती. तेथील पोलिसांच्या मदतीने छापे टाकून गुन्हेगारांचा शोध घेतला. चार संशयित हाती लागले; पण दाम्पत्याने नाव सांगितलेला गुन्हेगार मिळालेला नाही.
सांगली पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोल्हापूर पोलिसांनी मिरज व कर्नाटकात छापे टाकले आहेत. त्यांच्या पातळीवर ते गुन्हेगारांची धरपकड करीत आहेत. यामध्ये आम्हाला कोठेही सहभागी करून घेतलेले नाही.
आतापर्यंत त्यांना आम्ही तपासात मदत केली आहे. रिव्हॉल्व्हर तस्करी व रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या १८० गुन्हेगारांची चौकशी केली आहे. घटनेदिवशी व घटनेपूर्वी त्यांचे वास्तव्य कोठे होते, याची सर्व माहिती रेकॉर्डवर घेतली आहे. रेकॉर्डवरील सातशेहून अधिक दुचाकी चोरट्यांची चौकशी झाली आहे.
वाळवा तालुक्यातील चार तरुणांची नावे पुढे आली होती, त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. जोपर्यंत ठोस माहिती हाती लागत नाही, तोपर्यंत
चौकशी व छापासत्र सुरूच राहील.
(प्रतिनिधी)


‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ
पानसरे यांची हत्या २५ लाखांची सुपारी घेऊन करण्यात आल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सर्वत्र खळबळ उडाली. कोल्हापुरात पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी रात्री आठच्या सुमारास काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, गडहिंग्लज विभागाचे सुरेश मेंगडे, इचलकरंजी विभागाचे एम. एम. मकानदार, आदी उपस्थित होते.


माहिती देण्यास शर्मा यांचा नकार
सोमवारी सायंकाळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांना या प्रकरणात काही तथ्य आहे का? अशी विचारणा केली. त्यावर शर्मा यांनी पानसरे यांच्या हत्येचा तपास अत्यंत गोपनीय आहे, या तपासाबाबत वरिष्ठ पातळीवरून कोणतीही माहिती देण्यास निर्बंध असल्याचे सांगून माहिती देण्यास नकार दिला.


नेतेही चौकशीच्या जाळ्यात!
सांगली जिल्ह्यात फासेपारधी समाज व गुन्हेगारांना एकत्रित करून त्यांना शासनाच्या सोयी-सुविधा मिळवून देणारे काही नेते कोल्हापूर पोलिसांच्या चौकशीच्या जाळ्यात अडकले आहेत. या नेत्यांना प्रत्येक पारधी कुटुंबातील गुन्हेगार परिचयाचा आहे. यामुळे या नेत्यांकडून काही माहिती मिळते का, यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. या समाजातील गुन्हेगार पाच-दहा हजारांची चोरी करण्यात धन्यता मानतात. ‘सुपारी’ घेऊन पानसरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची ते हत्या करण्याचे धाडस करणार नाहीत, असा पोलिसांचा कयास आहे, परंतु मिळालेल्या कोणत्याही माहितीकडे दुर्लक्ष करायचे नाही, असा विचार करुन पोलिसांनी दाम्पत्याने दिलेल्या माहितीच्या आधारे तपासाला गती दिली आहे.


तीन वेळा संधी हुकली
पानसरे यांच्या हत्येचा तपास करीत असताना आतापर्यंत तीनवेळा महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागले होते, परंतु सर्व स्तरावर तपास करीत असताना अखेरच्या टप्प्यामध्ये संधी हुकली. गेले महिनाभर मेहनत करून चौथ्यांदा हाती लागलेल्या फासेपारधी गुन्हेगाराची टीप कोल्हापूर पोलिसांसाठी महत्त्वाची बनली आहे. त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर या घटनेमागचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Police raids on paddy sticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.