इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरडेवाडी टोलनाक्यावर राडा करत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. कर्मचाऱ्यांवर रिव्हॉल्व्हर रोखून, जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. मात्र, ही घटना रविवारी उघडकीस आली. याबाबत कर्मचाऱ्याने जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. नवनाथ हरिदास तरंगे (रा. तरंगवाडी, ता. इंदापूर ) असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १२) रात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडून पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ (एमएच ४२ के ७२८६) मधून चार अनोळखी इसम व चालकासह पोलीस निरीक्षक शिंदे सरडेवाडी टोलनाक्यावर आले. चालकाकडे टोलची मागणी केल्यानंतर सर्व जण गाडीच्या बाहेर आले. मारहाण करण्यास सुरुवात केली, असे तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)>मारहाण केली नाही : मधुकर शिंदेया संदर्भात पत्रकारांशी बोलताना पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे म्हणाले, टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याने शिवीगाळ केली. त्यामुळे कर्मचारी व वाहनचालक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. मी कुणालाही मारहाण केली नाही, आपण रिव्हॉल्व्हर रोखले नाही.या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. याबाबत टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहू शकता.
टोलनाक्यावर पोलिसांचा राडा
By admin | Updated: August 15, 2016 01:01 IST