बारवर पोलिसांचा छापा
By Admin | Updated: June 8, 2016 02:13 IST2016-06-08T02:13:13+5:302016-06-08T02:13:13+5:30
विनापरवाना डान्स बार चालवणाऱ्या कोपरखैरणेतील आदर्श बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

बारवर पोलिसांचा छापा
नवी मुंबई : विनापरवाना डान्स बार चालवणाऱ्या कोपरखैरणेतील आदर्श बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकून १० महिलांसह संबंधितांवर कारवाई केली. अनेक वर्षांपासून त्याठिकाणी विनापरवाना डान्स बार चालवला जात होता.
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्याकडून शहरातल्या बारमधील गैरहालचालींवर देखील करडी नजर ठेवली जात आहे. यादरम्यान कोपरखैरणेतील आदर्श बारमध्ये विनापरवाना डान्स बार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांना मिळाली होती. याआधारे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या पथकामार्फत त्यांनी सोमवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी तिथे विनापरवाना डान्स बार सुरू असल्याचे आढळून आले. सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक वर्षांपासून हा विनापरवाना डान्स बार सुरू होता. सदर बारवर यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई केलेली असतानाही तिथे विनापरवाना डान्स बार चालवला जात होता. याची माहिती मिळताच गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकला असता १० महिला डान्स करताना आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेवून बारचा मॅनेजर व इतर कामगारांच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)