पोलिसांसमोर ‘राधे माँ’ला उपरती
By Admin | Updated: August 15, 2015 00:21 IST2015-08-15T00:21:41+5:302015-08-15T00:21:41+5:30
कांदिवली पोलिसांनी पाच तास केलेल्या चौकशीत तथाकथित अवतार ‘राधे माँ’ने स्वत:च्या डोक्यावरील ओझे प्रवक्ता संजीव गुप्तावर टाकले. सर्व संपत्ती ही संजीवच्या नावे असल्याचा

पोलिसांसमोर ‘राधे माँ’ला उपरती
मुंबई : कांदिवली पोलिसांनी पाच तास केलेल्या चौकशीत तथाकथित अवतार ‘राधे माँ’ने स्वत:च्या डोक्यावरील ओझे प्रवक्ता संजीव गुप्तावर टाकले. सर्व संपत्ती ही संजीवच्या नावे असल्याचा गौप्यस्फोट ‘माँ’ने केला. विशेष म्हणजे पोलीस चौकशीला सामोरे गेल्यावर ‘मी देवी नाही किंवा दैवी अवतारही नाही’, असा साक्षात्कारही माँला झाला. दरम्यान, न्यायालयाने राधे माँला अंतरिम जामीन मंजूर केल्याने तिला दिलासा मिळाला आहे.
देणगी स्वरूपात गोळा होणारी सर्व संपत्ती संजीव यांच्या नावे आहे. संजीव हेच त्याचा हिशोब ठेवतात व देखभालही करतात. तसेच संजीव हेच माझाही खर्च भागवतात, अशी माहिती माँने आपल्या जबाबात दिल्याचे कांदिवली पोलिसांकडून समजते. दरम्यान, संजीव हे माँचे प्रवक्ते म्हणून काम पाहातात. तसेच ते तक्रारदार निकी गुप्ता यांचे मामे सासरे आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे ते मालाडच्या एमएम मिठाईवालाचे संचालक मनमोहन गुप्ता यांचे चिरंजीव आहेत. निकी यांनी सासरच्या मंडळींविरोधात हुंडा मागितल्याचा आरोप केला. या संदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवरील सुनावणीत न्यायालयाने कांदिवली पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. पोलिसांनी या प्रकरणी निक्कीच्या सासरच्या सहा मंडळींविरोधात गुन्हा नोंदविला. तसेच या सर्वांनी राधे माँच्या सांगण्यावरून आपला छळ केला या निकीच्या आरोपांनुसार माँलाही आरोपी केले. जबाब नोंदविण्यासाठी कांदिवली पोलिसांनी गेल्या आठवडयात माँला समन्स बजावले होते. तब्बल पाच तास कांदिवली पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. त्यानुसार तिचा जबाबही नोंदविण्यात आला.