धक्कादायक! हल्लेखोर रेती माफियांसोबत पोलिसांची चक्क सामिष पार्टी; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 08:46 AM2022-04-29T08:46:52+5:302022-04-29T08:48:29+5:30

पोलीस म्हणतो, तुमसरला असताना उडविली अनेक आरोपींची नावे

Police party with who attacking officers sand mafias; Video viral | धक्कादायक! हल्लेखोर रेती माफियांसोबत पोलिसांची चक्क सामिष पार्टी; Video व्हायरल

धक्कादायक! हल्लेखोर रेती माफियांसोबत पोलिसांची चक्क सामिष पार्टी; Video व्हायरल

googlenewsNext

भंडारा :  उपविभागीय अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या रेती तस्करांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांची रेती तस्करांसोबत चक्क सामिष पार्टी रंगल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. तुमसर ठाण्यात असताना अनेक आरोपींची नावे उडविली, ही तर किरकोळ बाब आहे, असे पवनी पोलीस ठाण्यात कार्यरत एक हवालदार रेती तस्करांना सांगताना या  व्हिडिओत दिसतो. ही पार्टी उमरेडजवळील एका ढाब्यावर बुधवारी दुपारनंतर झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, सामिष पार्टी करणाऱ्या पवनी ठाण्याच्या त्या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले. पोलीस हवालदार दिलीप धावडे, पोलीस शिपाई सुशांत कोचे आणि राजेंद्र लांबट अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर बुधवारी पहाटे ३.३० वाजता १५ ते २० रेती तस्करांनी हल्ला केला होता. त्यानंतर पवनी पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले. त्यातील एक पथक त्याच रेती तस्करांसोबत सामिष पार्टी करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

या व्हिडीओमध्ये एका ढाब्यावर पार्टी सुरू असून, पोलीस आपल्या ‘कर्तृत्वा’चा पाढा तस्करांसमोर वाचत असल्याचे दिसते. ‘आपण कशी मदत करतो हे, तुम्हाला तर माहीतच आहे. तुमसरमध्ये आरोपींची नावे उडवून टाकली होती. हे तर काहीच नाही, किरकोळ बाब आहे,’ असे सांगत हवालदार थेट आयजींचे नाव घेतो. दिलीप धावडे असे त्याचे नाव असून, तो सहा महिन्यांपूर्वी तुमसरहून पवनी येथे बदली होऊन आला असून, सध्या वाहतूक शाखेत कार्यरत आहे. या पार्टीत किशोर पंचभाई यांच्यासह हल्ला प्रकरणातील आरोपी राजू मेंगरे दिसत आहे. तर कोचे, लांबट हे पोलीस कर्मचारी ताव मारताना दिसत आहेत. दरम्यान, हल्ला करणाऱ्या तीन रेती तस्करांना पवनी पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

दोषींवर कडक कारवाई करा - आ. भोंडेकर 
एसडीओंवर हल्ला करण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. हल्लेखोर आरोपींचा शोध घेऊन तत्काळ कारवाई करावी, या मागणीचे पत्र आपण गृहमंत्र्यांना पाठविले आहे. रेती तस्करांची हिंमत वाढत असून, आता तर आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांनी चक्क रेती तस्करांसोबत पार्टीच केल्याचे उघड हाेत आहे. यावर आपण शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व महिती देणार असल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.

सामिष पार्टी करणारे तीन पोलीस निलंबित
एसडीओंच्या पथकावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांसोबतच पोलिसांनी सामिष पार्टी करणे हा प्रकार अत्यंत बेजबाबदारपणाचा असून, पोलीस खात्याला अशोभनीय असे वर्तन आहे. पोलीस खात्याची प्रतिमा त्यामुळे मलिन झाली आहे, असे तिघांच्या निलंबनाचा आदेश जारी करताना पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी म्हटले आहे.

Web Title: Police party with who attacking officers sand mafias; Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.