पोलिसांच्या बदलीचा आदेश फिरवला
By Admin | Updated: December 19, 2015 00:29 IST2015-12-19T00:29:51+5:302015-12-19T00:29:51+5:30
दोन आठवड्यांपूर्वी करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीमुळे निर्माण झालेली पोलीस दलातील खदखद शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलीचा

पोलिसांच्या बदलीचा आदेश फिरवला
- नरेश डोंगरे, नागपूर
दोन आठवड्यांपूर्वी करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीमुळे निर्माण झालेली पोलीस दलातील खदखद शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलीचा ‘तो‘ आदेशच फिरवला. परिणामी काही प्रमाणात का होईना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधील रोष निवळण्यास मदत झाली आहे.
गृहविभागाने ३ डिसेंबरला अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या, बढत्यांची यादी जाहीर केली. त्यानंतर ५ डिसेंबरला राज्यातील पाच पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात कोल्हापूरचे अधीक्षक मनोज शर्मा यांचाही समावेश होता. देशभर खळबळ उडवून देणाऱ्या पानसरे हत्याकांडाच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका वठविणाऱ्या शर्मा यांची कोल्हापूरहून बृहन्मुंबईला उपायुक्त म्हणून बदली जाहीर करण्यात आली होती. तर, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिकचे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना कोल्हापूरला अधीक्षक म्हणून नेमण्यात आले. देशपांडेंच्या रिक्त जागेवर वाशिमच्या अधीक्षक विनिता साहू, तर साहू यांच्या रिक्तपदी भंडाराचे अधीक्षक दिलीप झळके आणि उपायुक्त एम. के. भोसले यांना मुंबईहून त्याच पदावर बृहन्मुंबईला पाठविण्यात आले होते. भंडारा अधीक्षक पद रिकामे ठेवण्यात आले होते.
बदल्यांची यादी जाहीर होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यात (एका गटात) कमालीची खदखद निर्माण झाली होती. काही अधिकाऱ्यांनी या बदल्यांसाठी जोर लावल्याचे आणि वरिष्ठ पातळीवर एकतर्फी निर्णय घेतल्याचे उघडपणे बोलले जात होते. ‘मानहानीकारक निर्णय‘ अशा शब्दात या बदलीचे विश्लेषण करून बहुतांश वरिष्ठ नाराजी व्यक्त करीत होते. ही नाराजी कोल्हापूर, मुंबई, पुण्यापासून गडचिरोली, गोंदियापर्यंत चर्चेला आली होती. पोलीस महासंचालनालय व गृहमंत्रालयात सेतू म्हणून काम करणाऱ्या काहींनी ती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.
नवा आदेश, नवी जबाबदारी
१५ डिसेंबरला तीन पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार, बृहन्मुंबईतील उपायुक्त प्रशांत होळकर यांना वाशिमचे पोलीस अधीक्षक, विनिता साहू यांना गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक ऐवजी भंडारा येथे पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना वाशिम ऐवजी पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूरचे प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले.