तर्रर्र अवस्थेत पोलीस अधिकाऱ्याचा गोंधळ
By Admin | Updated: January 20, 2015 02:39 IST2015-01-20T02:39:02+5:302015-01-20T02:39:02+5:30
शहर पोलीस आयुक्तालयाजवळील बिनतारी संदेश कार्यालयात कर्तव्यावर असताना पोलीस उपअधीक्षकाने अतिमद्यप्राशन करून कार्यालयातच गोंधळ घातल्याचा प्रकार सोमवारी घडला़

तर्रर्र अवस्थेत पोलीस अधिकाऱ्याचा गोंधळ
अमरावतीतील घटना : बिनतारी संदेश कार्यालयात अधिकाऱ्यांशी अरेरावी, महिलांशीही असभ्य वर्तन
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयाजवळील बिनतारी संदेश कार्यालयात कर्तव्यावर असताना पोलीस उपअधीक्षकाने अतिमद्यप्राशन करून कार्यालयातच गोंधळ घातल्याचा प्रकार सोमवारी घडला़ नितीन जुवेकर असे या अधिकाऱ्याचे नाव असून, पोलिसांनी जुवेकर यांना अटक केली आहे़ दरम्यान, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी या प्रकारणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत़
पोलीस विभागाचे विभागीय बिनतारी संदेश कार्यालय अमरावतीत आहे. पोलीस उपअधीक्षक जुवेकर हे सोमवारी सकाळी मद्यधुंद अवस्थेतच कार्यालयात दाखल झाले. अतिमद्यप्राशनामुळे त्यांचा सारखा तोल जात होता.
खुर्चीवर नीट बसू शकत नसल्याने त्यांना अन्य अधिकाऱ्यांनी हटकले. मात्र, अधिकाऱ्यांसोबत अरेरावी करीत महिला कर्मचाऱ्यांनाही त्यांनी असभ्य वागणूक दिल्याचे पोलीस निरीक्षक अनिल साखरे यांनी फे्रजरपुरा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे़
जुवेकर दारू पिऊन कार्यालयात आल्याची तक्रार यापूर्वीही १३ जानेवारी रोजीही फे्रजरपुरा ठाण्यात करण्यात आली होती. त्या वेळी त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पण समज देऊन त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
हा तर नित्याचाच प्रकार!
जुवेकर हे नेहमीच नशेत असतात. त्यांची पुणे पोलीस विभागाच्या मुख्यालयात
३ डिसेंबर २०१४ रोजी फॅक्सद्वारे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले़
पोलीस अधिकाऱ्याने मद्यप्राशन करून कर्तव्यावर हजर होणे योग्य नाही़ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले जातील़ चौकशीनंतर नितीन जुवेकर या पोलीस उपअधीक्षकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल़
- राम शिंदे, गृहराज्यमंत्री (शहर)