पोलीस कोठडीच बनत आहे मृत्यूचे द्वार
By Admin | Updated: June 23, 2014 03:48 IST2014-06-23T03:48:13+5:302014-06-23T03:48:13+5:30
गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध ठिकाणच्या पोलीस कोठडींमध्ये तब्बल १५८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ महिन्यांतील त्यांची संख्या १६वर पोहोचली आहे

पोलीस कोठडीच बनत आहे मृत्यूचे द्वार
जमीर काझी, मुंबई
गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील विविध ठिकाणच्या पोलीस कोठडींमध्ये तब्बल १५८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ महिन्यांतील त्यांची संख्या १६वर पोहोचली आहे. दरवर्षी या प्रमाणात वाढ होत असल्याने कोठडी म्हणजे जणूकाही मृत्यूचे द्वार बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पोलीस कोठडीतील मृत्यू झालेल्यांमध्ये विविध गुन्ह्यांतील तपासासाठी आणलेल्या आरोपी, संशयितांचा समावेश आहे. कोठडीतील मृत्यूच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांकडून मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस ठाण्यात अटक केलेले आरोपी, संशयितांशी करावयाच्या वर्तणुकीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नियम घालून दिले आहेत. कैद्यांच्या मानवी हक्कावर कोणतीही गदा न आणता गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गेल्या काही वर्षांपासून पोलीस कोठडीतील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत ‘लोकमत’ने माहिती मिळविली असता ४ वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर आली.
राज्यामध्ये २०१० साली विविध पोलीस ठाण्यांत २४ जणांचा मृत्यू झाला. ११ व १२मध्ये ते प्रमाण अनुक्रमे ३५ व ३६ पर्यंत वाढले. तर गेल्या वर्षी तब्बल ४७ जण पोलीस कोठडीत मरण पावले. चालू वर्षात जानेवारीपासून ३१ मेपर्यंत १६ जणांच्या आयुष्याचा शेवट झाला आहे.