मुंबई : बारामती पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई एस. एन. वारे यांनी चार आरोपींना प्रत्यक्षात अटक करून कोर्टात हजर न करताच, तसे केल्याचा खोटेपणा उच्च न्यायालयात केला असून, पुण्याच्या पोलीस अधीक्षकांना या प्रकरणी जातीने लक्ष घालावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.वारे यांनी न केलेले काम आता बारामती पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी करावे आणि विश्वास नाना कांबळे, भानुदास नाना कांबळे, बबन मारुती कांबळे व सुरेश मारुती कांबळे यांच्यावर अजामीनपात्र वॉरन्ट बजावून, त्यांना १६ डिसेंबर रोजी न्यायालयासमोर हजर करावे, असा आदेश न्या. साधना जाधव यांनी दिला. बारामतीच्या पोलीस निरीक्षकांनी बुधवारी जातीने न्यायालयात हजर राहावे व या आरोपींवर खरोखरच वॉरन्ट बजावण्यात आले, याची खात्री करण्यासाठी येताना स्टेशन डायरीतील संबंधित नोंदीही सोबत आणाव्यात, असेही त्यांना बजावले आहे.वारे यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमानाची कारवाई करण्याचा विचार असल्याचेही न्या. जाधव यांनी नमूद केले. मात्र, त्या आधी वारे यांच्या गैरवर्तनाची कल्पना पोलीस अधीक्षकांना असावी, यासाठी न्यायालयाने याची माहिती त्यांना कळविली आहे. दरम्यान, ज्याच्यावर अजामीनपात्र वॉरन्ट बजावता आले नाही, असे बारामती पोलिसांनी कळविले, तो बळीराम धोंडीराम कांबळे हा आणखी एक आरोपी न्या. जाधव यांच्यापुढे सोमवारी स्वत:हून हजर झाला. पोलिसांनी बळीरामला बारामती येथील सत्र न्यायालयात हजर करावे व त्या न्यायालयाने त्याच्या जामिनावर निर्णय घ्यावा, असेही न्या. जाधव यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)काय आहे हे प्रकरण?सुमारे २० वर्षांपूर्वी एका फौजदारी खटल्यात सत्र न्यायालयाने विश्वास कांबळे, भानुदास कांबळे, बबन कांबळे, सुरेश कांबळे, बळीराम कांबळे आणि सुभाष सुगंध जगताप या आरोपींना शिक्षा ठोठावली. हे सर्व आरोपी जामिनावर असून, त्यांची अपिले उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. खरे तर या अपिलांवर जून २००६ मध्ये अंतिम सुनावणी व्हायची होती, परंतु त्यानंतर पुढील सुमारे १० वर्षे अनेक वेळा तारखा पडूनही आरोपी किंवा त्यांचे वकील हजर राहिले नाहीत. या पार्श्वभूमीवर न्या. साधना जाधव यांनी ५ डिसेंबर रोजी या सर्वांविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट काढले. बारामती पोलिसांनी हे वॉरन्ट बजावून, आरोपींना ताब्यात घ्यावे व १८ डिसेंबरपूर्वी न्यायालयात हजर करावे, असा आदेश दिला गेला.
पोलिसांचा हायकोर्टात खोटेपणा
By admin | Updated: December 16, 2015 02:51 IST