हिंगोलीमध्ये आंदोलक शेतक-यांवर पोलिसांचा लाठीमार
By Admin | Updated: June 2, 2017 15:27 IST2017-06-02T15:22:58+5:302017-06-02T15:27:17+5:30
आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत करणा-या शेतक-यांनी पोलिसांनी लाठीमार केल्यानं जमाव आक्रमक झाल्याची घटना हिंगोलीमध्ये घटना आहे.

हिंगोलीमध्ये आंदोलक शेतक-यांवर पोलिसांचा लाठीमार
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 2 - शेतकरी संपाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या खानापूर चित्ता, इसापूर, पिंपळखुटा, लासीना, सावरखेडा आदी ठिकाणांच्या शेतक-यांनी शुक्रवारी दूध, भाजीपाला व धान्य जिल्ह्याबाहेर जाऊ दिले नाही.
त्यानंतर टाकळी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको सुरू केले. मात्र आंदोलन संपल्यावर वाहतूक सुरळीत करणा-या शेतक-यांवरच लाठीमार केल्याने पोलिसांना धक्काबुक्की करण्याची आल्याची घटना घडली.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात हळूहळू शेतकरी संपाचे रान पेटू लागले आहे. बासंबा, चिंचोर्डी येथून आंदोलनाला सुरुवात झाली. आता खानापूर चित्ता, गोरेगाव, सेनगाव, केंद्रा बु., बोल्डा फाटा, येहळेगाव सोळंके अशा एकेका ठिकाणी परिसरातील गावातील शेतकरी जमून आंदोलनाला व्यापक स्वरुप देताना दिसत आहेत.
गोरेगावात कडकडीत बंद ठेवून मोंढाही बंद ठेवला होता. दूध, भाजीपाला व इतर साहित्य बाहेर जाऊ दिले नाही. सेनगाव येथेही मोंढा बंद ठेवून शेतक-यांच्या संपाला पाठिंबा देण्यात आला.
खानापूर चित्ता येथे दोनदा आंदोलन करण्यात आले. आधी शेतक-यांचा बाजारपेठेत जाणारा माल अडवला. नंतर शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. मात्र हे आंदोलन जवळपास दीड ते दोन तास चालल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. नंतर आंदोलन संपले आणि वाहतूक सुरळीत करण्यास आंदोलक शेतकरीच कामाला लागले.
तेवढ्यात पोलीस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे पथकासह तेथे आले. त्यांनी शेतक-यांवर लाठीचार्ज केला. यामुळे शेतकरी संतापले. त्यांनीही पोलिसांना धक्काबुक्की केली.
आम्ही वाहतूक सुरळीत करत असताना मारण्याचा काय अधिकार? अशी विचारणा करून शे-दोनशेचा जमाव आक्रमक झाला.
संपामध्ये आणखी सहभाग वाढणार
शेतकरी संपात सहभागी होणा-या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनाला आणखी धार देण्यासाठी आता गावोगाव बैठका होत आहेत. शेतक-यांना कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.