माकप कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार
By Admin | Updated: September 4, 2015 01:02 IST2015-09-04T01:02:41+5:302015-09-04T01:02:41+5:30
जिल्हा दुष्काळग्र्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गावर आंदोलन करणाऱ्या माकपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला

माकप कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार
परभणी : जिल्हा दुष्काळग्र्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गावर आंदोलन करणाऱ्या माकपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये ३० ते ४० आंदोलक जखमी झाले, तर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत ६ पोलीस जखमी झाले.
परभणी जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. मुख्यमंत्री पाथरी, मानवतमार्गे परभणीहून गंगाखेडकडे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जाणार होते. परभणी- गंगाखेडमार्गावरील सिंगणापूर फाटा येथे जवळपास २ हजार माकपचे कार्यकर्ते व शेतकरी कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच भजन आंदोलन करीत होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास या आंदोलकांना पोलिसांनी हटविण्याचा प्रयत्न केला. यातून वादावादी झाली. आंदोलक जागेवरून हालत नसल्याने २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलकांनीही या वेळी जोरदार दगडफेक सुरू केली. तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांच्या वाहनांची हवा सोडून देण्यात आली. या दगडफेकीत सहायक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे, पोलीस कर्मचारी स. रहीम स. अजीज, एल.पी. कांबळे, पठार शब्बीर खॉ, आवेज काजी व अन्य दोन महिला पोलीस जखमी झाले. पोलिसांनी या वेळी विलास बाबर यांच्यासह जवळपास १०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे शेतकऱ्यांनी तीन वेळा मुख्यमंत्र्यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला. फक्त घोषणा करू नका, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना काय देणार ते सांगा, असा सवाल स्वराज घुंबरे या शेतकऱ्याने केला. यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाला विहीर, शेततळे आणि विद्युत मोटार देण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यानंतर काही वेळात पुन्हा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे काय झाले? असे विचारायला सुरुवात केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी येथे राजकारण आणू नका, पक्षीय मतभेद बाजूला ठेवा, असे सांगत भाषण आटोपते घेतले.
शिवसैनिकांची घोषणाबाजी
मुख्यमंत्र्यांचे ढालेगाव येथील सभास्थळी आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणा दिल्या.