बसव महामोर्चावर पोलिसांचा लाठीमार
By Admin | Updated: February 23, 2016 00:47 IST2016-02-23T00:47:08+5:302016-02-23T00:47:08+5:30
कौठा येथे बसवेश्वर महाराजांचा पुतळा स्थापन करण्याच्या मागणीसाठी, तीन तास ठिय्या देऊनही पालिका आयुक्तांनी भेट नाकारल्याने, बसव महामोर्चेकऱ्यांनी दगडफेक सुरू केल्याचा प्रकार

बसव महामोर्चावर पोलिसांचा लाठीमार
नांदेड : कौठा येथे बसवेश्वर महाराजांचा पुतळा स्थापन करण्याच्या मागणीसाठी, तीन तास ठिय्या देऊनही पालिका आयुक्तांनी भेट नाकारल्याने, बसव महामोर्चेकऱ्यांनी दगडफेक सुरू केल्याचा प्रकार सोमवारी घडला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात २५ आंदोलक जखमी झाले़
महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समितीने कौठा परिसरातून पालिकेवर महामोर्चा काढला होता़ १५ हजारांहून अधिक वीरशैव बांधव यात सहभागी झाले होते़ दुपारी मोर्चा मनपावर धडकला़ आ़ हेमंत पाटील, आ़ प्रताप पाटील चिखलीकर, आ़ सुभाष साबणे, आ़ डॉ़ तुषार राठोड यांनी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी पाठिंबा दर्शवित, काँग्रेसवर कडाडून टीका केली़, तसेच आयुक्त सुशील खोडवेकर यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन घ्यावे, अशी मागणी केली़
राष्ट्रसंत डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी आंदोलनकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतरही आयुक्त आले नाहीत. त्यामुळे आंदोलकांनी तीन तास ठिय्या दिला़ सायंकाळी अध्यक्ष प्रकाश कौडगे यांनी गाढवाला निवेदन देऊन मोर्चाचा समारोप केला़ मंगळवारी सर्वपक्षीय जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)
आमदार व्यासपीठावरून खाली उतरताच, संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला़ यात एका डॉक्टरसह २० ते २५ आंदोलनकर्ते जखमी झाले़ रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.