पोलिसाने मारला १८ लाखांवर डल्ला
By Admin | Updated: July 31, 2016 02:19 IST2016-07-31T02:19:07+5:302016-07-31T02:19:07+5:30
कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार मालाडच्या कुरार पोलीस ठाण्यात उघडकीस आला आहे.

पोलिसाने मारला १८ लाखांवर डल्ला
मुंबई : कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार मालाडच्या कुरार पोलीस ठाण्यात उघडकीस आला आहे. ज्यात एका पोलीस शिपायाने त्याच्या ताब्यातील मुद्देमालापैकी १८ लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी कुरार पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. फरार पोलिसाचा शोध सुरू आहे.
रमजान तडवी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल खटल्यात पुरावा म्हणून वापरण्यासाठी पोलीस ठाण्यात एका कपाटात जमा करण्यात येतो. अशाच प्रकारे कुरार पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालापैकी जवळपास ५१ प्रकरणांतील मुद्देमाल गायब असल्याचे कुरारचे पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या लक्षात आले. ज्याची किंमत १८ लाख ४५ हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महागड्या मोबाइल फोनचा समावेश असल्याचे समजते. तडवीने १५ जुलैपासून रोखपाल व सुरक्षित मुद्देमालाचा कारकून म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यामुळे या सगळ्या ऐवजाची जबाबदारी तडवीवर होती. १५ ते १७ मार्चदरम्यान या सामानात अफरातफर झाल्याचा शिंदे यांना संशय आला. (प्रतिनिधी)