पोलिसांचा तपास जवळपास पूर्ण
By Admin | Updated: September 19, 2015 03:28 IST2015-09-19T03:28:59+5:302015-09-19T03:28:59+5:30
बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी जवळपास पूर्ण केला असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार परिस्थितीजन्य आणि तांत्रिक

पोलिसांचा तपास जवळपास पूर्ण
मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी जवळपास पूर्ण केला असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे या हत्येमागील अर्थकारणाचा छडा सीबीआयला लावावा लागणार आहे.
गोदादे गावातून जप्त करण्यात आलेली कवटी संगणकाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या शीनाच्या छायाचित्राशी मिळतीजुळती असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय इंद्राणी मुखर्जी आणि सिद्धार्थ दास यांचे डीएनए शीनाच्या मृतदेहाच्या अवशेषांशी जुळले आहेत.
मिखाईलचा मृतदेह पुरण्यासाठी विकत घेण्यात आलेली बॅग जप्त करण्यात आली असून दादर येथील ज्या दुकानातून ही बॅग खरेदी करण्यात आली, त्या दुकानदाराचा जबाबही मुंबई पोलिसांनी नोंदविला आहे.
या गुन्ह्णासाठी वापरण्यात आलेली ओपेल कारही जप्त करण्यात आली असून त्या कारमालकाचा जबाबही घेण्यात आलेला आहे. तसेच पीटर मुखर्जी आणि मिखाईल यांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत.
शीना अमेरिकेत असल्याचा ईमेल शीना बोराकडून मिळाल्याचे पीटर आणि मिखाईल यांनी पोलिसांना चौकशीत सांगितले आहे. तथापि, हा ईमेल इंद्राणीनेच पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामकुमार रायचा जबाब महत्त्वपूर्ण असून या प्रकरणात त्याला माफीचा साक्षीदार करण्यासंबंधी पोलिस विचार करीत आहेत. शीनाला भाडेकरार संपुष्टात आणायचा आहे, अशा आशयाचे पत्र अपार्टमेन्ट मालकापर्यंत पोहोचविण्यासाठी इंंद्राणीने मिखाईला कसा वापर केला, हेही पोलिसांनी उघडकीस आणले आहे. ही घटना घडली तेव्हा संजीव खन्ना हॉटेल हिलटॉपमध्ये मुक्कामाला असल्याची नोंदही मिळाली असून या प्रकरणात हाही एक महत्त्वाचा पुरावा आहे. पोलिसांना सर्व फोन कॉलची माहिती मिळविण्यात यश आले आहे.
शोध अर्थकारणाचा
या हत्येमागे अर्थकारण असल्याचा शोध सीबीआयला घ्यावा लागणार आहे. मुंबई पोलिसांनी पूर्णवेळ न्यायवैद्यक अकाऊंटिंग पथक नियुक्त करूनही पोलिसांना या प्रकरणामागील अर्थकारणाचे धागेदोरे मिळाले नाही. मुखर्जी दाम्पत्यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी अंमलबजावणी संचानालयाला लेखी विनंती करूनही ईडीकडून मुंबई पोलिसांना अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आयएनएक्स मीडिया प्रा.लि. सौद्यात मुंबईस्थित कंपनी असल्याचे समजते.