औरंगाबाद गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक लाच स्विकारताना गजाआड
By Admin | Updated: February 7, 2015 02:12 IST2015-02-07T02:12:53+5:302015-02-07T02:12:53+5:30
कारवाई टाळण्यासाठी स्विकारली पाच लाखांची लाच, शेगावात रचला सापळा.

औरंगाबाद गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक लाच स्विकारताना गजाआड
अकोला: एका तक्रारकर्त्याविरूद्ध कारवाई टाळण्यासाठी औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी अवधुतराव ठाकरे यांना पाच लाख रूपयांची लाच स्विकारताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेगाव येथे रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील तक्रारकर्ते शेख शफी यांच्याविरूद्ध औरंगाबाद येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. या गुन्हय़ामध्ये कारवाई टाळण्यासाठी औरंगाबाद येथील पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी तक्रारकर्त्यास १0 लाख रूपयांची लाच मागितली. तक्रारकर्ता शेख शफी यांनी दीड लाख रूपये पोलीस निरीक्षक ठाकरे यांना यापूर्वीच दिले होते. उर्वरित लाचेची रक्कम देण्यासाठी ठाकरे शफीवर दबाव टाकून, पोलीस कारवाई करण्याची धमकी देत होते. अखेर तक्रारकर्त्याने त्यांना उर्वरित रक्कम देण्याची तयारी दाखवून, पैसे घेण्यासाठी ठाकरे यांना शेगाव येथे बोलाविले. दरम्यान, यासंदर्भात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याने तक्रार केली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी शेगाव येथे सापळा रचला. पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे शेगाव येथे आले. ठरल्याप्रमाणे एका हॉटेलमध्ये व्यवहार झाला. तक्रारकर्त्यांने ठाकरे यांना ५ लाख रूपये देताच, दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी पोलीस निरीक्षक ठाकरे यांना रंगेहाथ अटक करून, त्यांच्याजवळून पाच लाख रूपयांची रोकड जप्त केली. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिली.