मनसेच्या 'मुश्किल'चा सामना करण्यासाठी पोलिसांची हेल्पलाईन
By Admin | Updated: October 20, 2016 11:05 IST2016-10-20T11:05:14+5:302016-10-20T11:05:14+5:30
चित्रपट निर्माते आणि राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये ही हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मनसेच्या 'मुश्किल'चा सामना करण्यासाठी पोलिसांची हेल्पलाईन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - करण जोहरची निर्मिती असलेल्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेपासून असलेला धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी स्पेशल हेल्पलाईन सुरु केली आहे. चित्रपट निर्माते आणि राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये ही हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसालीकर आणि सहआयुक्त देवेन भारती या बैठकीला उपस्थित होते. मनसेकडून चित्रपटगृहाची तोडफोड होण्याचा धोका असल्याने चित्रपट निर्मात्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे.
पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने मनसेने हा चित्रपट प्रदर्शित करु नका असा थिएटरमालकांना इशारा दिला आहे. हाच धोका लक्षात घेऊन हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून, थेट गुन्हे शाखेच्या कार्यालयाशी ही हेल्पलाईन जोडलेली आहे. या हेल्पलाईनमुळेच मेट्रो सिनेमागृहामध्ये आंदोलन करणा-या मनसेच्या १२ कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करणे पोलिसांना शक्य झाले.