पोलीस दलात फेरबदल
By Admin | Updated: August 15, 2015 00:31 IST2015-08-15T00:31:41+5:302015-08-15T00:31:41+5:30
राज्य पोलीस दलात लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. सध्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या जागी प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती जवळपास नक्की मानली जात आहे.

पोलीस दलात फेरबदल
- यदु जोशी, मुंबई
राज्य पोलीस दलात लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. सध्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या जागी प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती जवळपास नक्की मानली जात आहे. दयाळ ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचीही त्याचवेळी पदोन्नती होणार असल्याने मुंबई पोलिसांना नवा कॅप्टन मिळणर आहे.
दीक्षित हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक आहेत. पोलीस महासंचालकपदासाठी ज्येष्ठतेचा विचार करता त्यांचेच नाव पुढे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनाच पसंती देतील असे म्हटले जाते. एसीबीचे प्रमुख म्हणून दीक्षित यांची कारकिर्द नेहमीच प्रभावी राहिली आहे. अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.
सेवाज्येष्ठतेचा विचार करता दत्ता पडसळगीकर यांचे नाव आघाडीवर आहे. ते सध्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (आयबी) अतिरिक्त संचालक आहेत. त्यांना तिथेच संचालक म्हणून पदोन्नती मिळाली तर मात्र अन्य नावांचा विचार होऊ शकतो. त्यात के.के.पाठक, प्रभात रंजन, व्ही.डी.मिश्रा, सुबोधकुमार जयस्वाल, के.एल.बिष्णोई, एस.पी.यादव आणि संजय बर्वे यांचा समावेश आहे. सेवाज्येष्ठतेत मागे असले तरी जयस्वाल आणि बर्वे आयुक्तपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आयुक्त कोण होणार याला अधिक महत्त्व असेल.
पोलीस महासंचालकपदानंतर प्रतिष्ठेचे मानले जाते ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद. या पदावर कोणाची नियुक्ती होणार या बाबत उत्सुकता आहे. त्यासाठी अहमद जावेद (महासंचालक; होमगार्डस्), विजय कांबळे (महासंचालक; राज्य पोलीस सुरक्षा महामंडळ) आणि सतीश माथूर (महासंचालक; विधी व तांत्रिक विभाग) यांची नावे आघाडीवर आहेत. त्यातील अहमद जावेद हे जानेवारी २०१६ मध्ये तर विजय कांबळे फेब्रुवारी २०१६ मध्ये निवृत्त होत आहेत. त्यांना अनुक्रमे चार- पाच महिन्यांसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदी आणले जाईल का हा प्रश्न आहे. इतक्या अल्पकाळासाठी दोघांपैकी एकाला एसीबी प्रमुख करण्याऐवजी अधिक कालावधी असलेल्या व्यक्तीला नेमण्याचे ठरले तर सतीश माथूर यांचे नाव नक्की होईल, असे मानले जाते. माथूर जून २०१८ मध्ये निवृत्त होणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंधित प्रकरणांची चौकशी सध्या एसीबीकडे आहे.
चढती भाजणी
- राज्य पोलीस दलात महासंचालक दर्जाच्या सहा जागा आहेत. त्यातील दयाळ आणि राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे महासंचालक असलेले अरुप पटनायक हे दोघेही ३० सप्टेंबरला निवृत्त होतील.
- मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया आणि मीरा बोरवणकर हे सध्या अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत.
-या दोघांना पुढील महिन्यात दयाळ आणि अरुप पटनायक यांच्या निवृत्तीनंतर महासंचालक म्हणून पदोन्नती मिळेल.