पोलीस दलाचा ‘चेहरा’ बदलणार

By Admin | Updated: November 4, 2014 01:05 IST2014-11-04T01:05:19+5:302014-11-04T01:05:19+5:30

नव्या सरकारच्या राज्याभिषेकाला काही तासांचाच कालावधी झाला असताना राज्य पोलीस दलाचा ‘चेहरा’ बदलण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अनेक बहुचर्चित

Police force 'face' will change | पोलीस दलाचा ‘चेहरा’ बदलणार

पोलीस दलाचा ‘चेहरा’ बदलणार

राज्यात नव्या डीजींची चर्चा : संधी कुणाला ?
नरेश डोंगरे - नागपूर
नव्या सरकारच्या राज्याभिषेकाला काही तासांचाच कालावधी झाला असताना राज्य पोलीस दलाचा ‘चेहरा’ बदलण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अनेक बहुचर्चित प्रकरणांच्या तपासात पोलीस हतबल ठरल्यामुळेच हा बदल चर्चेला आला आहे.
राज्यात गेल्या काही वर्षात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दोन-तीन वर्षात तिने कळसच गाठला आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या राज्य पोलीस दलाला ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा उलगडा करण्यात एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही यश आलेले नाही. अनेक प्रकरणात पोलीस हतबल ठरल्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाचा नाकर्तेपणा सर्वत्र चर्चेला आला आहे. नवे सरकार राज्य पोलीस दलाला अधिक सक्षम आणि कार्यक्षम करणार असे संकेत असतानाच पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्या बदलीचेही वारे वाहू लागले आहेत. सुमारे दोन वर्षांपासून पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. काही वर्षांपासून राज्यात गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे. क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी (२०१३) बिहारपेक्षा जास्त हिंसक गुन्हे महाराष्ट्रात घडले. बिहारमध्ये गेल्यावर्षी एकूण ३०२१३ गुन्हे घडले. तर, महाराष्ट्रात घडलेल्या गुन्ह्यांचा आकडा ३२,८१५ आहे. २०१२ मध्ये ही आकडेवारी क्रमश: २९,८४२ आणि २६,९७१ अशी होती.
दलितांवरील अत्याचारातही मोठी वाढ झाली आहे. अगदी ताजी प्रकरणे सांगायची म्हटल्यास अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे हत्याकांड आणि परवा पुण्याजवळ झालेल्या दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराचे उदाहरण सांगता येते. या एकूणच प्रकारामुळे महाराष्ट्र पोलीस दलाला नवा सेनापती मिळावा, राज्याचे पोलीस दल अधिक सक्षम केले जावे आणि राज्यातील नागरिकांना गुन्हेगारीपासून दिलासा मिळावा, अशी स्वाभाविक अपेक्षा केली जात आहे.
संजीव दयाल
दयाल यांची प्रतिमा स्वच्छ (नॉनकरप्ट) आहे. मात्र, काही विशिष्ट अधिकाऱ्यांवरच त्यांची मेहरनजर असल्याचा पोलीस दलात सूर आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक चांगल्या अधिकाऱ्यांवर विशेषत: मपोसे आणि मराठी अधिकाऱ्यांवर नाहकच दयाल यांच्याकडून अप्रत्यक्ष अन्याय झाल्याचेही बोलले जाते. नागपुरातील धंतोली ठाण्यात दयाल यांच्याविरोधात गेल्या वर्षी ‘अ‍ॅट्रोसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. डीजी असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात चर्चेला उधाण आले होते.
प्रवीण दीक्षित
स्वच्छ प्रतिमेचे धनी असलेले प्रवीण दीक्षित रिझल्ट ओरिएन्टेड म्हणूनही ओळखले जातात. ‘जेथे जातील, तेथे करून दाखवतील’, अशीही त्यांची ख्याती आहे. सध्या ते डीजी अ‍ॅन्टीकरप्शन म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्या बांधण्याचा सपाटाच महाराष्ट्रात लागला आहे. त्यांनीच महिनाभरापूर्वी भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन (टोल फ्री नंबर) सुरू करून भ्रष्टाचाऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून सेवारत असताना ते २४ तास आॅनड्युटी असायचे. पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी ते रात्री- बेरात्री स्वत:च बाहेर पडून ‘पेट्रोलिंग‘ चेक करायचे. ड्रंकन ड्राईव्ह सुरू करून त्यांनी पोलिसांच्या तिजोरीत घसघशीत गंगाजळी भरली होती.

Web Title: Police force 'face' will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.