पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

By Admin | Updated: July 1, 2016 04:16 IST2016-07-01T04:16:48+5:302016-07-01T04:16:48+5:30

ठाण्यातील चेकमेट या कंपनीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेतील चोरटे पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले

Police detained four quarters | पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात


ठाणे : ठाण्यातील चेकमेट या कंपनीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेतील चोरटे पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून तपासासाठी वागळे इस्टेट पोलिसांसह गुन्हे शाखेची १० पथके राज्यासह परराज्यांतदेखील शोध घेत आहेत. गुन्हा घडल्यानंतर घटनेची माहिती एक तासाने पोलिसांना मिळाल्याने दरोडेखोरांना पलायन करण्यास वेळ मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे या दरोड्यात कंपनीतीलच कुणी घरभेदी आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली असून पोलिसांनी आतापर्यंत चार ते पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यात ठाण्यातील बाळकुम परिसरातील दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्याकडून दरोड्यात गेलेली काही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून ती किती आहे, याची माहिती मिळू शकली नाही.
हा दरोडा पडत असताना कंपनीत दोघे सुरक्षारक्षक आणि १७ कर्मचारी कार्यरत होते. यातील पहिल्या गेटवर रामचंद्र कोरी, तर आतल्या बेसमेंटच्या गेटवर पवार हे सुरक्षारक्षक होते. पहिल्या गेटमधून माकडटोपी परिधान केलेले तिघे आणि रु मालाने तोंड झाकलेल्या एकाची छबी कंपनीतील स्क्रीनवर दिसल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी काहीच दक्षता कशी घेतली नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच दरोड्यानंतर तब्बल एक तासाने पोलिसांना कळवल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच चोरट्यांना ठाणे शहराबाहेर पळून जाण्यास वाव मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
>मोबाइल डीसीआयद्वारे चोरांचा शोध सुरु
दरोडेखोर कंपनीतून मुद्देमालासह बाहेर पडल्यानंतर पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे. यात ३० ते ३५ वयोगटांतील चार चोरटे खांद्यावर ड्रम घेऊन रस्त्यावर पळताना दिसत आहेत.
याशिवाय, चोरट्यांनी लांबवलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाच मोबाइलचा डीसीआर काढून त्याद्वारे चोरांचा माग काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. याबाबत, काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एकूण ९ कोटी १६ लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे सांगितले.
मात्र, नक्की कितीची लूट झाली, याचा संभ्रम कायम आहे. तर, पोलिसांनी ८५ कर्मचाऱ्यांची चौकशी करून रात्री उशिरा चार जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. परंतु, याविषयीची अधिक माहिती मात्र मिळू शकलेली नाही.

Web Title: Police detained four quarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.