रोडरोमीओंचे आता पोलीस करणार शूटिंग!
By Admin | Updated: August 28, 2014 03:34 IST2014-08-28T03:34:04+5:302014-08-28T03:34:04+5:30
शाळा-कॉलेज, रेल्वे स्थानक बस स्टॉप किंवा अगदी गल्लीच्या नाक्यावर महिलांची छेड काढणाऱ्यांनो सावधान

रोडरोमीओंचे आता पोलीस करणार शूटिंग!
मुंबई : शाळा-कॉलेज, रेल्वे स्थानक बस स्टॉप किंवा अगदी गल्लीच्या नाक्यावर महिलांची छेड काढणाऱ्यांनो सावधान. तुम्ही केलेला पाठलाग, आळवलेली शिट्टी किंवा मारलेले टोमणे व्हिडीओ कॅमेऱ्यात चित्रित होणार आहेत. इतकेच नव्हे तर हे चित्रण तुमच्या आईवडिलांना, बहिणीला, अगदी पत्नीलाही दाखवले जाणार आहे.
येता-जाता महिलांना छेडणाऱ्या रोडरोमीओंचा बंदोबस्त करण्यास उत्तर मुंबईचे अपर आयुक्त किशोर जाधव यांनी हा उपक्रम सुरू केला. रोमीओंचे मानसिक खच्चीकरण करण्यास त्यांच्या उदाहरणाने इतरांनी धसका घ्यावा, या उद्देशाने साध्या वेषातली पोलीस पथके छेडछाडीच्या घटना कॅमेराबद्ध करतील. कारवाईत सापडलेला विद्यार्थी असल्यास, पहिल्यांदाच सापडलेला असल्यास त्याला पुन्हा छेडछाड करताना पकडल्यास अटक केली जाईल, अशी ताकीद पालकांसमोर देऊन सोडण्यात येईल. मात्र सराईतांना थेट गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल, असे जाधव यांनी स्पष्ट केले. या कारवाईतून पोलीस सगळीकडे आहेत, पोलिसांचे सर्वत्र लक्ष आहे, छेडछाड केल्यास कारवाई होणारच, हा महत्त्वाचा संदेश सर्वत्र पसरेल. शिवाय रोडरोमीओंचे मानसिक खच्चीकरण होईल. त्याचा धसका इतर घेतील, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.