गळफास घेऊन पोलिसाची आत्महत्या
By Admin | Updated: September 19, 2016 00:34 IST2016-09-19T00:34:00+5:302016-09-19T00:34:00+5:30
एका पोलीस कर्मचाऱ्याने घरामध्ये गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली.

गळफास घेऊन पोलिसाची आत्महत्या
पुणे : वाहतूक शाखेच्या कोंढवा विभागात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने घरामध्ये गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात असून, आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. विशेष म्हणजे हा पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयाच्या फुटबॉल संघाचा खेळाडू होता.
राजेश गणेश माळशेकर (वय ३६, रा. पापडे वस्ती, भेकराईनगर, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. माळशेकर यांचे लग्न झालेले असून, काही महिन्यांपासून ते एकटेच राहत होते. त्यांची पत्नी व दोन मुले गावी राहण्यास गेले होते. त्यांच्या घरातील नळ सुरू राहिल्यामुळे पाणी वाया जात होते. त्यांच्या शेजाऱ्याने माळशेकर यांचे दार वाजवले. बराच वेळ प्रयत्न करूनही घरामधून काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.