पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायर’ देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 01:06 IST2017-01-29T01:06:06+5:302017-01-29T01:06:06+5:30
नथुराम गोडसेवरील नाटकाला नागपुरात विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्याचा इशारा देणारा फलक नागपूर पोलिसांनी लावला होता. याची गंभीर

पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायर’ देणार
नागपूर : नथुराम गोडसेवरील नाटकाला नागपुरात विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्याचा इशारा देणारा फलक नागपूर पोलिसांनी लावला होता. याची गंभीर दखल घेत, महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी ३० जानेवारी रोजी नागपूर पोलीस आयुक्तांना काँग्रेसतर्फे ‘जनरल डायर’ पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या नाटकाचा २२ जानेवारी रोजी नागपूर येथे प्रयोग असताना, त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेससह इतर संघटनांचे कार्यकर्ते निदर्शने करीत असताना, त्यांना पोलिसांच्या वतीने गोळीबाराची जाहीर धमकी देणारा फलक दाखविण्यात आला होता. या प्रकारामुळे नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांसह पोलीस मॅन्युअलचेदेखील उल्लंघन झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारने नागपूर पोलीस आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली होती, परंतु सरकारने त्या मागणीला काहीही उत्तर दिलेले नसून, नागपूरचे पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तांना पुरस्कार देणार असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)