गांधी आश्रम परिसरात पोलीस- नागरिक आमने-सामने
By Admin | Updated: July 30, 2014 01:17 IST2014-07-30T01:17:40+5:302014-07-30T01:17:40+5:30
खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत गांधी आश्रम येथील नागरिकांनी मंगळवारी परिसरातील सार्वजनिक जागेत साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची स्थापना करण्यासाठी बांधकाम सुरु केले.

गांधी आश्रम परिसरात पोलीस- नागरिक आमने-सामने
तणाव सदृष्य परिस्थिती : अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा वाद पेटला
अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत गांधी आश्रम येथील नागरिकांनी मंगळवारी परिसरातील सार्वजनिक जागेत साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची स्थापना करण्यासाठी बांधकाम सुरु केले. बांधकामाची परवानगी नसल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. सुरु असलेले बांधकाम त्यांनी बंद केल्याने नागरिक व पोलीस आमने-सामने आले. त्यामुळे तेथे काहिवेळ तणाव सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.
स्थानिक गांधी आश्रम येथील वार्ड क्रमांक ३१ येथील सार्वजनिक जागेत साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ही मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहुन मंगळवारी परिसरातील नागरिकांनी तेथे पुतळ्याची स्थापना करण्यासाठी बांधकाम करणे सुरु केले होते. परवानगी नसताना पुतळा बसविण्यासाठी नागरिकांनी बांधकाम सुरु केल्याची माहिती पोलिसांना मिळताच खोलापुरी गेटचे पोलीस निरीक्षक बी.डी. डाखोरे, उपनिरीक्षक शिवराम थोरात हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह सायंकाळी ५ वाजता गांधी आश्रम परिसरात दाखल झाले. पोलीस परिसरात दाखल झाल्याचे पाहुन तेथे शेकडो नागरिकांची गर्दी जमली. तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे पाहुन तेथे अतिरीक्त पोलीस कुमक बोलाविण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथील नागरिकांची समजुत घातल्यानंतर तेथील तणाव निवळला. पुतळ्याची स्थापना करण्याची परवानगी मिळण्यासाठी बुधवारी गांधी आश्रम परिसरातील नागरिक महानगर पालिका आयुक्तांना निवेदन देणार आहे. परवानगी न मिळाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा तेथील नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)