पोलिसांची तरुणीसह आईला मारहाण

By Admin | Updated: September 29, 2015 03:05 IST2015-09-29T03:05:13+5:302015-09-29T03:05:13+5:30

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणीसह ५५ वर्षीय आईला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली

Police brutally beaten the girl's mother | पोलिसांची तरुणीसह आईला मारहाण

पोलिसांची तरुणीसह आईला मारहाण

मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणीसह ५५ वर्षीय आईला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी पोलीस उपायुक्तांना चौकशी करुन दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिले आहे.
मीरारोड येथे राहणारी नंदिनी गोस्वामी ही तरुणी शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास आई, वडिलांसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती. सामान्य नागरिकांच्या रांगेत उभी असताना व्हीआयपी प्रवेशद्वारातून नागरिक जातात हे पाहून तिनेही व्हीआयपी गेटकडे धाव घेतली. अशात गेटच्या आत प्रवेश करणार तोच तेथे तैनात असलेल्या महिला पोलिसांनी तिच्या आईला धक्काबुक्की करत बाहेर काढले. यामध्ये त्यांचे कपडे फाटले. आईला मारहाण केल्यानंतर नंदिनीने पोलिसांकडे जाब विचारण्यास सुरुवात केली. नंदिनीच्या आक्रोशाने तेथील महिला पोलिसांनी तिला एखाद्या जनावरासारखे मारहाण करण्यास सुरुवात केली. चारही बाजूने महिला पोलीस तिला मारहाण करत होते.नंदिनीच्या बचावासाठी तिच्या वडिलांनी तिला कवेत घेतले तर आईनेही मदतीसाठी पुढाकार घेतला असता, आईलाही महिला पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या वयाचा विचार न करता महिला पोलीस त्यांना मारहाण करत होते. मारहाण करत तिला काळाचौकी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे तिला १२०० रुपयांच्या दंड ठोकून रात्री अडीचच्या सुमारास सोडण्यात आले. यावर कारवाई व्हावी, यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करणार असल्याचेही नंदिनीने सांगितले.
----------
महिला पत्रकारालाही ठेवले डांबून : पत्रकार पूनम अपराज या शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घरी जाण्यास निघाल्या. तेव्हा लागबागच्या राजाच्या दर्शनासाठी चुकीच्या पद्धतीने प्रवेश दिला जात असल्याने त्यांनी चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच तिला धक्काबुकी करत तिच्याकडील मोबाईल हिसकावून सर्व व्हीडिओ क्लीप डिलीट केल्या. त्यानंतर तिला मारहाण करत पोलीस व्हॅनमधून काळाचौकी पोलीस ठाण्यात आणले. तेथे तिला रात्री अडीचच्या सुमारास १२०० रुपयांचा दंड आकारुन सोडल्याची तक्रार तिने दिली आहे.
-------
दबंग पोलीस निलंबित होणार?
तरुणीसह महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपायुक्त अशोक दुधे करत आहेत.
-------
महिला संघटनांचा निषेध : पत्रकारासह तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. वुमन जर्नलिस्ट असोसिएशनकडून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई व्हावी, यासाठी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Police brutally beaten the girl's mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.