पोलिसांच्या चुकीने एकास अटक

By Admin | Updated: June 3, 2015 05:03 IST2015-06-03T03:41:08+5:302015-06-03T05:03:04+5:30

राज्य पोलीस दलाकडे मांस ओळखण्याचे कोणतेही तंत्र नसल्याचे स्पष्ट झाले असून वरळी पोलिसांनी अलीकडेच गोमांस विकण्याच्या

Police arrested one by one | पोलिसांच्या चुकीने एकास अटक

पोलिसांच्या चुकीने एकास अटक

मुंबई : राज्य पोलीस दलाकडे मांस ओळखण्याचे कोणतेही तंत्र नसल्याचे स्पष्ट झाले असून वरळी पोलिसांनी अलीकडेच गोमांस विकण्याच्या आरोपात एका खाटिकाला अटक केल्यानंतर ते म्हशीचे मांस असल्याचे उघड झाल्याने पोलिसांवर नामुष्की ओढवली आहे.
गोमांस विकण्याच्या आरोपात वरळी पोलिसांनी अलीकडेच एका खाटिकाला अटक केली होती. पुढे ते गोमांस नसून म्हशीचे मांस असल्याचे स्पष्ट झाले. हस्तगत केलेले मांस ओळखण्याचे कोणतेही तंत्र उपलब्ध नाही. त्यामुळे पोलीसच काय पण या चाचण्या करणाऱ्यांनाही प्रथमदर्शनी मांसाचे वर्गीकरण करणे कठीण आहे. प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतरच ते स्पष्ट होऊ शकते. कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत मांसाचे वर्गीकरण किंवा ओळखण्याचे तंत्र आहे. त्यासाठी तज्ज्ञांचे पथक आणि यंत्रसामुग्रीही उपलब्ध आहे, अशी माहिती सहसंचालक दौंडकर यांनी ‘लोकमत’ला दिली. राज्यात अशा सहा प्रयोगशाळा असून मांसाची ओळख पटविण्यासाठी अनेक नमुने आले आहेत. त्यांची तपासणी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात गोवंश हत्याबंदी लागू झाल्यापासून हिंदुत्ववादी संघटना मांस विक्रेत्यांविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी करत आहेत. त्यामुळे पोलीस अनेक ठिकाणी धाडी टाकून मांस विक्रेत्यांना अटक करत आहेत.
वरळीत गेल्या महिन्यात अक्रम कुरशी हे गोमांस विक्री करत असल्याची तक्रार भारतीय गोवंश रक्षण व संवर्धन परिषदेचे सदस्य आणि प्रा. शरद गुप्ता यांनी पोलिसांकडे दिली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी कुरेशीला अटक केली व त्याच्याविरोधात नवीन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला.
तसेच त्याच्याकडे असलेले मांस चाचणीसाठी परळ येथील बॉम्बे व्हेटरनरी महाविद्यालयाकडे पाठवले. महाविद्यलयाच्या प्रयोग शाळेने गेल्या आठवड्यात याचा अहवाल दिला. ते गोमांस नसून म्हशीचे मांस
असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान कोणतीही शहानिशा न करता अथवा मांसाचे नमुने तपासल्याखेरीज कोणालाही अटक केली जाऊ नये, असे आदेश मुंबईचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Police arrested one by one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.