पोलिसांना माझ्या सुरक्षेची काळजी नाही : केसरकर
By Admin | Updated: April 30, 2015 13:20 IST2015-04-29T21:58:16+5:302015-04-30T13:20:25+5:30
पोलिसांबाबत नाराजी : पालकमंत्र्यांकडून खडे बोल

पोलिसांना माझ्या सुरक्षेची काळजी नाही : केसरकर
सावंतवाडी : सिंधुदुर्ग सोडला, तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी मला सुरक्षेबाबतचा कधी प्रश्न उद्भवत नाही. कर्नाटकात मी येणार म्हटल्यावर तेथील अधिकारी फोन करत असतात. मग सिंधुुदुर्गातच मला योग्य सुरक्षा का पुरवली जात नाही, येथील पोलीस माझ्या सुरक्षेबाबत गंभीर नाहीत. याबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणार आहे, असे सांगत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग पोलिसांबाबतची आपली नाराजी पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्याकडे व्यक्त केली. तुम्ही माझ्या सुरक्षेबाबत गंभीर नाही, मग सामान्यांची सुरक्षा कशी करणार, असे यावेळी त्यांनी बोलून दाखवले.
पालकमंत्री केसरकर आढावा बैठकीनिमित्त सावंतवाडीत आले होते. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, पोलीस खात्यातील कोणताही वरिष्ठ अधिकारी बैठकीला फिरकलाच नाही. पोलीस निरीक्षक रणजित देसाई या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्याकडे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपली नाराजी बोलून दाखविली. मी सिंधुदुर्ग सोडून कोठेही गेलो, तर माझ्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जाते. मग सिंधुदुर्गमध्येच पोलीस का एवढे बेफिकीर आहेत? ते माझी सुरक्षा करू शकत नाहीत, तर सर्वसामान्य जनतेची सुरक्षा कशी काय करणार, असा सवाल यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षकांना केला.
माझ्या बरोबर नेहमी दोन सुरक्षारक्षक राज्यात कुठेही गेलो तरी असतात; पण सिंधुदुर्गात एकही सुरक्षा रक्षक नसतो. रेल्वेने प्रवास मी एकटा करतो. त्यावेळी कोणीही बरोबर नसतो. कर्नाटकात मी गेल्यास तेथे कर्नाटक राज्याचे पोलीस व्हॅन घेऊन उभे असतात. अनेकवेळा मला वेळ झाला, तर सतत संपर्क करीत असतात; पण येथील पोलिसांना माझ्या सुरक्षेची काळर्जी नाही का? तसे असेल, तर मला तुमच्या वरिष्ठांशी बोलावे लागेल, असे सांगितले.
मी तीस मंत्र्यांमधील एक मंत्री असून मलाही प्रोटोकॉल आहे. येथील पोलीस जर प्रोटोकॉलच विसरत असतील, तर त्यापेक्षा वाईट ते काय, असा सवालही पालकमंत्र्यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)
यापूर्वीही गृहराज्यमंत्र्यांकडे तक्रार
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे गोव्यात सुरक्षा मिळत नसल्याबाबत तक्रार केली होती. यावेळी शिंदे यांनी आपणासही गोव्याने सुरक्षा दिली नाही, असे सांगत आपण काही करू शकत नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगितले होते. त्यानंतर पुन्हा एकदा बुधवारी पालकमंत्री केसरकर यांनी ही तक्रार केली आहे.